बुलढाणा जिल्ह्याच्या लिंगा (ता. सिंदखेडराजा) येथील शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर, कापूस, हरभरा आदी शेतमालाची खरेदी करून २९ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी व्यापारी पितापुत्राला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
लिंगा येथील प्रल्हाद जायभाय यांनी शेतकऱ्यांकडून खासगीरित्या सोयाबीन, तूर, कापूस, हरभरा यांसारख्या कृषीमालाची खरेदी केली; मात्र अधिकृत कृषीमाल खरेदी परवाना नसताना हे व्यवहार केले. जायभाय आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जाऊळका, दुसरबीड, केशव शिवणी तसेच आसपासच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला होता.
शेतकऱ्यांनी वारंवार आपल्या रकमेची मागणी केली; परंतु व्यापाऱ्याने टाळाटाळ करत त्यांची दिशाभूल केली. अखेर त्रस्त शेतकऱ्यांनी किनगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
५ डिसेंबरला अटक
• शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपी प्रल्हाद जायभाय पोलिसांच्या संपर्कापासून दूर राहत होता. त्याचा मुलगा पवन प्रल्हाद जायभाय यास ३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली, तर फरार प्रल्हाद जायभाय यास ५ डिसेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले.
• दोन्ही आरोपींना ६ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, संयुक्तिक पीसीआर चार दिवसांसाठी मंजूर केला. पुढे ९ डिसेंबर रोजी न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडी वाढवून ११ डिसेंबरपर्यंत वाढवली.
• तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपी व्यापाऱ्याने २९ शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करून त्यांची एकूण २९,६१,८८५ रुपयांची रक्कम फसवणुकीच्या मार्गाने घेतली होती. दुय्यम ठाणेदार मोहन गीते हे या प्रकरणाचे तपास अधिकारी असून, पोलिस तपासात पुरावे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
• तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीकडे मिळालेल्या पावत्या आणि इतर कागदपत्रांचे पुरावे उपलब्ध असूनही, अद्याप कोणतीही रक्कम हस्तगत झालेली नाही. रक्कम परत मिळावी, अशी मागणी शेतकरी सातत्याने करत आहेत.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
