आकाश येवले
राहुरी : हुबेहूब सफरचंदसारखी दिसणारी, चिकूच्या आकाराएवढी अॅपल बोरं ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रंगाने हिरवट चवीला गोड, आवळ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या अॅपल बोरांची राहुरी मार्केटला आवक सुरू झाली आहे.
शहरात सर्वधिक चमेली, उमरण प्रजातीच्या Apple Bor अॅपल बोरांची चलती आहे. अॅपल बोरांचे सरासरी भाव २०-२५ रुपये किलो इतके आहे.
सध्या सर्वत्र बोरांचा सीजन सुरू आहे. विद्यापीठाने प्रसारित केलेल्या बोरांच्या विविध जाती तालुक्यासह संपूर्ण राज्यात निदर्शनास येत आहे.
राहुरी शहरामध्ये प्रामुख्याने गोल बोर, सुंदरी बोर, रेड अॅपल बोर, अॅपल बोर, चमेली बोर, उमरण बोर व कडाका बोर या जाती प्रामुख्याने निदर्शनास येतात.
त्यामध्ये सर्वाधिक मागणी चमेली व उमरण बोराला आहे. तर दुसऱ्या बाजूला अॅप्पल बोराला परराज्यात मागणी असल्याची माहिती फळांचे व्यापारी दीपक रकटे यांनी दिली आहे.
राहुरी मार्केटला दैनंदिन एक ते दीड टन विविध बोरांच्या जाती येतात. त्यांना किलोला वीस रुपये असून २५ रुपयांपर्यंत मार्केट आहे.
तर राजस्थान, यूपी, एमपी, जम्मू, काश्मीर आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार माल पुरविला जातो. यांना सरासरी तीस ते पस्तीस रुपयांचा भाव मिळतो.
गावरान बोर झाले नामशेष
सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. गावरान बोरांचे उत्पन्न कमी आहे. त्यापटीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या विविध जाती प्रचलित झाल्या असून कमी खर्चामध्ये तसेच अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हायब्रीड बोराची शेती करण्यास सुरुवात केली. तसेच रानावनामध्ये डोंगराळ बांधावर पहावयास मिळणारी गावरान बोराची झाडे तोडून टाकल्याने ती अलीकडील काळात नामशेष झाली आहे.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दैनंदिन एक ते दीड टन विविध जातींच्या बोराची आवक सुरू आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने किलोला वीस रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. - दीपक रकटे, फळांचे व्यापारी
मी रेड अॅपलची शेती केली आहे. एक एकर शेतीमध्ये ३००-३५० झाडे बसविण्यात आली आहे. आत्तापर्यंत दोन ते सव्वादोन लाखापर्यंतचा खर्च झाला आहे. १५ टन माल निघेल. बोराची जागेवर किरकोळला ५० ते ६० रुपये विक्री करतो. तसेच मार्केटला सरासरी ३० रुपयेपर्यंत भाव मिळतो. त्यामुळे अंदाजे आठ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. - दत्तात्रय म्हसे, रेड अॅपल उत्पादक
बोरामध्ये बोराण सत्व असते. ते शरीरासाठी खूप फायदेशीर असून ओठ फाटणे, शरीर तडकणे यासाठी बोरोप्लसचे काम करते. - मधुकर निकम, योग शिक्षक
अधिक वाचा: हरभरा पिकातील सद्यस्थितीत घाटे अळीच्या नियंत्रणासाठी करा ह्या सोप्या फवारण्या