कोल्हापूर : शेंगदाणा तेलाचे दर दोनशे रुपयांवर आहेत; पण त्या तुलनेत भुईमूग शेंगांना भावच नाही. भुईमुगाच्या पेरणीपासून काढणीपर्यंत घ्यावे लागणारे कष्ट, कष्टाच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते.
शेंगांचा दर प्रतिक्विंटल पाच हजार रुपये मिळतो, एकरी उत्पादन व त्यासाठी येणारा खर्च पाहिला तर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जाते. शेंगदाणा तेलाचे दर चांगले आहेत.
त्यामुळे भुईमूग शेंगांचे उत्पादन वाढणे अपेक्षित होते; पण वर्षागणिक जिल्ह्यातील उत्पादन कमी होत आहे. जिल्ह्यात चार लाख हेक्टर पेरक्षेत्रापैकी सर्वाधिक उसाचे आहे.
त्यापाठोपाठ भाताचे क्षेत्र असून भुईमूग खरीप व रब्बी हंगामात घेतला जातो. दोन हंगामात तरी एकूण पेरक्षेत्राच्या ७ टक्केच भुईमूग पीक घेतले जाते.
शेंगदाणा तसेच शेंगदाणा तेलाचे भाव कमी होण्यापेक्षा दरवाढीची गती जास्त आहे मात्र, असे असूनही अत्यंत कमी कालावधीत येणाऱ्या भुईमूग पीक पेऱ्याबाबत शेतकरी उदासीन दिसून येत आहे.
एकरी ७ क्विंटलच शेंगांचे उत्पादन
खरीप हंगामात डोंगरमाथ्यावर भुईमुगाचे पीक घेतले जाते. रब्बी हंगामात खूप कमी घेतले जाते. त्यात एकरी उत्पादन पाहिले तर ७ ते ८ क्विंटलच मिळते. किडींचा प्रादुर्भाव त्यातून करावी लागणारी कीटकनाशकांची फवारणी, महागडी खते घालून हातात शेंगाची फोलफटे पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मोर, वानरांचाही उपद्रव
भुईमुगासाठी मशागतीपासून काळजी घ्यावी लागते. बियांची उगवण झाल्यानंतर मोरांचा त्रास सुरू होतो. किमान पंधरा दिवस मोरांपासून सांभाळावे लागते. काढणीला आल्यानंतर वानरांचा त्रास सुरू होतो. भुईमुगाचे पीक न घेण्यामागे हे महत्त्वाचे कारण आहे.
'सरकी', 'सूर्यफूल'ची गोडी
शेंगदाणा तेलाचे दर चढे आहेत. त्याऐवजी 'सरकी', 'सूर्यफूल', 'सोयाबीन' तेलाचा वापर वाढला आहे.
भुईमूग शेंगांना दर कमी मिळतो, कष्ट आणि खतावर होणारा खर्च पाहता हातात काहीच पडत नाही. त्यामुळे भुईमूग करण्याची मानसिकता कमी होत आहे. - युवराज खाडे, शेतकरी