नरवाड : नागवेलींच्या पान बाजार आवक कमी झाल्यामुळे अचानक वाढला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पान उत्पादक शेतकऱ्यांचे पानमळे मुळकुजव्या रोगामुळे नष्ट होत आहेत.
परिणामी, पानमळ्यांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटत आहे. उपलब्ध पानमळ्यांवरील उतरणी सुरू असल्यामुळे पानांच्या आवकेत घट झाली असून दर वाढले आहेत.
जिल्ह्यातील पानमळ्यांचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. मिरज तालुक्यातील नरवाड, बेडग, आरग, तसेच कर्नाटकातील चिकोडी, आगळगाव, शिरगाव, कुडगी, जगदाळ, आदी भागातील पानमळ्यांचे क्षेत्र कमी झाले आहे.
मिरज तालुक्यातून खाऊच्या "कपुरी" जातीची पाने महाराष्ट्रासह अन्य राज्यात पाठविली जातात. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे पानमळे प्रभावित झाल्याने पान उत्पादकांपासून ते पान वितरकांपर्यंत गणित बिघडले आहे.
पानमळ्यांची उतरणी मार्गशीष ते माघ महिनाअखेर होत असल्याने पानांची आवक कमी होते. परिणामी, व्यापारी चेन्नईमधून पाने मागवतात पण तिथेही घट असल्याने सध्या उपलब्ध पानांना चढ्या किमतीत विकले जात आहे.
सध्या ३००० पानांचा दर ५००० ते ६००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पानमळ्यांतून पानांचा पुरवठा कमी होत असल्याने दर वाढले आहेत.
शेतकऱ्याचे नुकसान न होता पानांचे दर कायमस्वरूपी वाढलेले राहावेत, अशी उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. - मधुकर जाधव, पान उत्पादक शेतकरी, नरवाड
अधिक वाचा: सोयाबीन बाजारात साडेतीन वर्षाच्या प्रदीर्घ मंदीनंतर स्पर्धा वाढली; दर अजून वाढण्याची शक्यता
