दरीबडची : दिवाळीनंतर बेदाणा दरात प्रतिकिलो सरासरी ४० रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी यंदाचे वर्ष बेदाणा उत्पादकांसाठी तेजीत राहण्याचे संकेत आहेत.
यंदा माल कमी आहे. मार्चमध्ये होळी व रमजान सण आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला अच्छे दिन येणार आहेत. मागील वर्षभरात बेदाण्याला दर मिळत नसल्याने माल कोल्ड स्टोअरेजमधून पडून राहिला.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला दर वाढला आहे. यंदा माल कमी असल्याने दरात तेजी कायम राहणार आहे. मागील वर्षीचा मालही संपलेला असल्याने यंदा शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळणार आहेत.
जत पूर्व भागात नैसर्गिक संकटाने उत्पादन घटले आहे. आगाप द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा बाजारात द्राक्ष कमी आले. सध्या चांगला दर आहे.
शेतकऱ्यांनी बेदाण्यासाठी सोडलेल्या बागाही मार्केटिंगसाठी व्यापारी खरेदी करीत आहेत. उशिरा ऑक्टोबरमध्ये झालेल्या छाटणीमुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये द्राक्ष शेडवर जातील. मार्चअखेर एप्रिलमध्ये नवीन बेदाणा बाजारात येईल.
द्राक्ष, बेदाणा खाणार भाव!
यंदा काही शेतकऱ्यांनी बागा काढल्या आहेत. तसेच वातावरणाच्या बदलामुळे मालही कमी निघत आहे. त्यामुळे दर चांगला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. येत्या महिन्याभरात बेदाण्याला २२० ते २५० रुपये दर मिळणे शक्य आहे. हा भाव मिळाणार असल्याने शेतकऱ्यांचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे चांगले वातावरण आहे.
बेदाण्याचे दर
बेदाणा प्रकार | दिवाळीपूर्वीचा दर | सध्याचा दर |
हिरवा बेदाणा | १५० ते १६० रु. | २०० रु. |
पिवळा बेदाणा | १२० ते १३० रु. | १६० ते १७० रु. |
काळा बेदाणा | ६० ते ७० रु. | ९० ते १२० रु. |
फेब्रुवारीत नवीन माल येणार
जत पूर्व भागातील शेतकऱ्यांनी द्राक्ष काढून शेडवर माल टाकलेला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून नवीन माल येण्यास सुरुवात होणार आहे. सरासरी माल कमी निघत असल्याचे शेतकरी सांगत आहे.