विठ्ठल खेळगी
सोलापूर : मागील वर्षभरात बेदाण्याला दर मिळत नसल्याने माल कोल्ड स्टोरेजमधून पडून राहिला. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दर वाढला आहे. यंदा माल कमी असल्याने दरात तेजी कायम राहणार आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही मागील दोन-तीन वर्षापासून बेदाणा मार्केट सुरु झाले आहे. सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, कर्नाटकातील विजयपूर, इंडी आदी भागातून बेदाणा सोलापूरला येत आहे.
मागील वर्षी राज्यात २ लाख मेट्रिक टन बेदाणा जूनपर्यंत पडून होता. एप्रिलनंतर दर कमी होत गेला. दिवाळीनंतरही दर वाढला नाही. १३० ते १४० रुपयांपर्यंत दर राहिला.
सहा महिने बेदाणा ठेवूनही दर वाढत नसल्याने दिवाळीत आणि ख्रिसमस सणावेळी मिळेल, त्या दरात बेदाणा विकला गेला. त्यानंतर आता जानेवारीत दर वाढत आहे.
मात्र, शेतकऱ्यांकडे माल नाही. सध्या १७५ ते २०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. येत्या काही दिवसात जुना माल पूर्णपणे संपणार आहे. त्यामुळे दर वाढलेला असला तरी त्याचा लाभ कमी शेतकऱ्यांना मिळाला आहे.
फेब्रुवारीत नवीन माल येणार
सोलापूर, विजयपूर, पंढरपूर आदी भागातील शेतकऱ्यांनी द्राक्ष काढून आता शेडवर माल टाकलेला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून नवीन माल येण्यास सुरुवात होणार आहे. सरासरी माल कमी निघत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे यंदा २०० रुपयांपर्यंत दर राहण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात सोलापुरात दर गुरुवारी बेदाणा लिलाव सुरू होणार आहे.
२०० रुपयांपर्यंत भाव जाण्याची शक्यता
२०० रुपयांपर्यंत बेदाण्याचा दर जाण्याची शक्यता आहे. यंदा शेतकऱ्यांकडे माल कमी आहे. मागील वर्षीचा मालही संपलेला असल्याने यंदा शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी बेदाण्याला दर मिळालेला नाही. त्यामुळे यंदा काही शेतकऱ्यांनी बागा काढल्या आहेत. तसेच वातावरणाच्या बदलामुळे मालही कमी निघत आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा माल कमीच राहणार आहे. त्यामुळे दर चांगला मिळेल, अशी आशा आहे. - शिवानंद शिंगडगाव, बेदाणा व्यापारी, सोलापूर
अधिक वाचा: शेतीमध्ये पहिलेच पाऊल टाकत केली या विदेशी पिकाची लागवड; खर्च वजा जाता तीन लाखांचे उत्पन्न