सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी बेदाणा लिलावास प्रारंभ झाला. यंदा वर्षातील पहिल्याच लिलावात ९७ टन मालाची आवक होती.
त्यातील २२५ किलो बेदाण्याला प्रतिकिलो उच्चांकी ३०१ रुपयांचा दर मिळाला. एवढा दर बेदाण्याला कधीच मिळाला नव्हता. सोलापूर बाजार समितीत दर गुरुवारी बेदाणा लिलाव होणार आहे.
त्या लिलावाला दि. २० फेब्रुवारी सुरुवात झाली. प्रशासक मोहन निंबाळकर आणि सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या हस्ते पूजा करून लिलावास सुरुवात झाली.
या लिलावप्रसंगी श्रीशैल अंबारे, शांतवीरप्पा बणजगोळे, शिवानंद शिंगडगाव, सचिन ख्याडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. मागील वर्षी दर न वाढल्यामुळे दिवाळीनंतर साधारण १५० ते १७५ प्रतिकिलो दरात विक्री केली होती.
३०१ रुपये प्रतीकिलो दर
लिलावात कर्नाटकातील विजयपूर येथील शेतकरी पी. एम. पाटील यांच्या २२५ किलो बेदाण्याला इतिहासात उच्चांकी ३०१ रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे त्या शेतकऱ्याला लॉटरीच लागल्याच्या भावना व्यक्त झाल्या. व्ही. आर बी. अॅग्रो या आडत्याकडून आरती ट्रेडिंग कंपनीने माल खरेदी केला.
५८ टन बेदाण्याची विक्री
नवीन बेदाण्याची आवक झाली आहे. गुरुवारी झालेल्या लिलावात विजयपूर, सांगली, तासगाव, पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला. एका दिवसात २७ टन बेदाण्याची आवक झाली होती. त्यातील ५८ टन बेदाण्याची विक्री झाली, तर ३९ टन माल शेतकऱ्यांना ठेवला आहे. सरासरी दरही १६० रुपये मिळाला आहे.
मागील वर्षी दर नसल्याने यंदा उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बेदाण्याला चांगला दर मिळणार आहे. सोलापुरात उच्चांकी दर मिळाला. पुढील वर्षभर यंदा चांगला दर राहील, असा अंदाज आहे. - शिवानंद शिंगडगाव, व्यापारी
अधिक वाचा: जीएसटीमुक्त केलेला बेदाणा कोल्ड स्टोरेज मध्ये गेला की लागतोय जीएसटी; कसा काय? वाचा सविस्तर