गत चार वर्षांपासून केळीला समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परंतु सणासुदीच्या काळात दर घसरल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या जवळा पांचाळ, रेडगाव, वडगाव, वसफळ, गुंडलवाडी, डिग्रस, सालापूर आदी परिसरातील शेतकरी केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. गतवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला केळीला २५०० रुपये प्रति क्विंटल दराने भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी आनंदी होता, परंतु सध्या केळीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून केळीला ६०० ते ११०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. महिनाभरापूर्वी केळीला १५०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल दर होता. परंतु उत्तर भारतात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने केळीची निर्यात थांबली आहे.
केळीला योग्य भाव देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी
• महाराष्ट्रासह इतर राज्यांत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसाचा कहर सुरू आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने वाहतुकीला फटका बसत आहे.
• तसेच मागणी नसल्याने दरामध्ये घसरण झाली असल्याचे सांगितले जात आहे. सर्व प्रकारामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्यामुळे केळीला चांगला भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी आसिफ पठाण, ओम उबाळे यांनी केली आहे.