पुणे : हिवाळ्याला प्रारंभ झाला की, आठवण होते ती हुरड्याची... अशा हुरड्याची आवक सध्या मार्केट यार्डात सुरू झाली आहे.
पावसाचा मुक्काम वाढल्याने नेहमीच्या तुलनेत १५ दिवस विलंबाने आवक सुरू झाली असली तरी हुरड्याला चांगला भाव मिळाला आहे.
बाजारात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मार्केट यार्डातील जय शारदा गजानन ४८८ क्रमांकाच्या गाळ्यावर ही आवक झाली.
बाजारात दाखल झालेल्या या मालास किलोला ४०१ रुपये मिळाल्याची माहिती व्यापारी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
शेतकरी माऊली चोथे, तुकाराम सुकाळशे यांच्या शेतातून प्रत्येकी १० किलो हुरड्याची आवक झाली.
गोव्यातूनही मागणी
◼️ लिलावात सुबोध ऊर्फ नाना झेंडे आणि सीताराम वाडकर यांनी हुरडा खरेदी केला. आता आवक वाढत जाईल.
◼️ घरगुती ग्राहकांसह गार्डन, हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटनस्थळी खाद्यपदार्थांची विक्री करणारे हुरडा खरेदी करत असतात.
◼️ गोव्यातूनही हुरड्याला मागणी आहे. यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे उत्पादन चांगली होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
थंडीच्या काळात हुरड्याला चांगली मागणी असते. मार्केट यार्डात हुरड्याला मागणी वाढली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत हुरड्याचा हंगाम सुरू असणार आहे. गार्डन, हॉटेल, रेस्टॉरंटवाले हुरडापार्थ्यांचे आयोजन करतात. यावेळी मात्र प्रचंड मागणी असते. - माऊली आंबेकर व पांडुरंग सुपेकर, व्यापारी, मार्केट यार्ड
अधिक वाचा: कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' १२ साखर कारखान्यांनी जाहीर केली पहिली उचल; जाणून घ्या सविस्तर
