पारनेर: कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (दि. ७) पुन्हा ९३ हजार ३५३ कांदा गोण्यांची विक्रमी आवक झाली.
लिलाव झालेला कांदा उचलला जाणार नसल्याने शुक्रवारचे लिलाव पुन्हा एकदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव यांनी दिली.
रविवारी (दि. ११) नियमित कांदा लिलाव होणार आहेत. लाल कांद्याची आवक वाढल्याने मागील १० दिवसांत तिसऱ्यांदा लिलाव रद्द करण्याची वेळ आली. गेल्या लिलावात ९२ हजार ४६७ कांदा गोण्यांची आवक झाली होती.
पारनेरबाजार समितीत जागेची व हमालांची मोठी कमतरता आहे. तसेच बाजार समितीच्या आवारातील वजनकाटा बिघडल्याने दोन वेळा लिलाव रद्द करावे लागले होते.
परंतु बुधवारी (दि. ७) एकाच दिवसात लाखांच्या आसपास कांदा गोण्यांची आवक झाल्याने बाजार समितीतील लिलावाचे नियोजन कोलमडले.
बुधवारी झालेल्या लिलावात कसा मिळाला दर?
◼️ ५ ते १० वक्कलला १९०० ते २००० रुपये.
◼️ एक नंबरच्या लाल कांद्यास १५०० ते १८०० रुपये.
◼️ दोन नंबरच्या लाल कांद्यास ११०० ते १४०० रुपये.
◼️ तीन नंबरच्या कांद्यास ६०० ते १ हजारापर्यंत भाव मिळाले.
व्यापारी व हमालांच्या मागणीनुसार बुधवारी (दि.७) आलेली आवक एका दिवसात उचलणे शक्य नाही. ट्रकची कमतरता असल्याने शुक्रवारी (दि. ९) लिलाव बंद राहतील. रविवारी (दि. ११) नियमित शेतमाल खरेदी-विक्रीला सुरुवात होईल. - किसनराव रासकर, सभापती, बाजार समिती, पारनेर
अधिक वाचा: 'एनसीडीसी'त घोटाळा; कर्ज गैरवापरामुळे राज्यातील २४ साखर कारखान्यांची चौकशी होणार
