नवी मुंबई : नव्या कांद्याची आवक वाढल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. १५ दिवसांपूर्वी २० ते ५० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याचे दर शुक्रवारी ५ ते २८ रुपयांपर्यंत घसरले.
किरकोळ मार्केटमध्येही २० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. हवामानातील बदलामुळे यावर्षी कांदा हंगाम उशिरा सुरू झाला. आवक कमी होत असल्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांद्याचे दर तेजीत होते.
परंतु, गेल्या काही दिवसांपासून नव्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली. शुक्रवारी बाजार समितीमध्ये १,४३६ टन आवक झाली. खराब झालेल्या हलक्या दर्जाच्या कांद्याची विक्री पाच रुपयांना होत होती.
उत्तम प्रतीचा कांदा २० ते २८ रुपये किलो दराने विकला जात होता. हेच दर ५ डिसेंबरला २० ते ५० रुपये किलो होते. बाजार समितीमध्ये सोलापूर, अहमदनगर, पुणे परिसरातून तसेच काही प्रमाणात नाशिकवरूनही आवक होत आहे.
बाजार समितीमधील पंधरा दिवसांतील बाजारभाव
दिनांक - प्रतिकिलो दर
५ डिसेंबर - २० ते ५०
१२ डिसेंबर - १० ते ४८
१९ डिसेंबर - २० ते ५०
कांद्याचे दर झाले कमी
किरकोळ मार्केटमध्येही कांद्याचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. हलक्या प्रतीचा कांदा काही ठिकाणी २० ते ३० रुपये किलो दराने विकला गेला. चांगल्या प्रतीच्या कांद्याची विक्री ६० रुपयांपर्यंत सुरू आहे
मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. नवीन कांदा मार्केटमध्ये आल्यामुळे दर कमी होत असून, पुढील काही दिवस कांद्याचे दर वाढणार नाहीत. - अशोक वाळूज, संचालक, कांदा मार्केट