पारनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (दि. ३१) जवळपास ७८ हजारांवर कांदा गोण्यांची आवक झाली. त्यामुळे शुक्रवारी (दि. २) होणारे लिलाव पुन्हा स्थगित करण्याची वेळ बाजार समितीवर आली.
कांद्याची विक्रमी आवक झाल्याने जागेअभावी, तसेच हमालांची कमतरता अन् वजनकाटा बिघडल्याने शुक्रवारचे लिलाव स्थगित केल्याची माहिती सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव यांनी दिली.
आर्थिक वर्षातील हंगामात विक्रमी ४१९ वाहनांतून ७८ हजार ८३८ कांदा गोण्यांची आवक झाली. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाल्याने बाजार समितीत मोठी कांदा आवक होत आहे.
बाजार समितीत कांदा ठेवण्यास जागा नसल्याने मागील आठ दिवसांत दोन वेळा कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते.
पारनेर बाजार समितीत या महिन्यात मागील १५ दिवसांत ४ लाख ७ हजार ६८६ कांदा गोण्या व १८७९ मालट्रकची आवक झाली. त्यामुळे समितीच्या आवारात कांदा टाकण्यास जागा राहिली नाही.
परिणामी लाल कांद्याचे भाव घसरले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या लिलावात प्रथम क्रमांकाच्या लाल कांद्यास १९०० ते २४०० रुपये, तर गावरान एक नंबर कांदा १५०० ते १८०० रुपये दराने विकला गेला.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. बाजार समितीत १५ दिवसांपूर्वी बाजारभाव सुमारे ३५०० ते चार हजारांवर पोहोचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आणला व त्याचा परिणाम कांद्याचे बाजारभाव घसरण्यात झाली आहे.
३१ डिसेंबरचे बाजारभाव
गावरान कांदा
प्रथम - १५०० ते १८००
दोन - ११०० ते १४००
तीन - ६०० ते १०००
लाल कांदा
प्रथम - १९०० ते २४००
दोन - १४०० ते १९००
तीन - ८०० ते १३००
कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने, तसेच वजनकाटा बिघडल्याने शुक्रवारचे लिलाव बंद ठेवले आहेत. यापुढे कांदा उत्पादकांची अडचण होऊ देणार नाही. यापुढे लिलाव बंद ठेवण्यात येणार नाहीत. रविवारी लिलाव सुरळीत होतील. - किसनराव रासकर, सभापती, पारनेर बाजार समिती
अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यात 'या' २३ कारखान्यांनी अखेर जाहीर केला ३ हजार व त्यापेक्षा अधिक ऊस दर
