मिरची उत्पादक राज्यात मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उत्पादनात सुमारे ४० टक्के घट झाली आहे. यामुळे आवक जेमतेम असल्याने आणि मागणी वाढल्याने मिरचीच्या दरात ५० टक्के वाढ झालेली आहे.
बेडगी मिरचीचा दर ४०० रुपये किलोवर गेला आहे. तसेच एप्रिल-मे महिन्यातही मिरची दरात वाढ होण्याचा अंदाज आहे. तर मसालाही महाग झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
जिल्ह्यात भाजीसाठी चटणी लागते. यासाठी लाल मिरची आणि मसाला लागतो. त्यातच दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात नागरिक सहा महिने ते वर्षभराचे गणित करून चटणी करून ठेवतात.
त्यामुळे फेब्रुवारी ते मे या महिन्यांदरम्यान मिरची आणि मसाल्याला मागणी अधिक राहते. त्यामुळे दरात वाढ होते; पण यावर्षी मिरचीच्या दरात वाढ अधिक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मिरची दरात ५० टक्के वाढ झाली आहे. यामुळे आर्थिक बजेट कोलमडलेले आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात नागरिक सहा महिने ते वर्षभर पुरेल अशा रीतीने गणित करून चटणी करून ठेवतात. त्यामुळे उन्हाळ्यात लाल मिरचीला मोठी मागणी असते.
कश्मिरी बेडगीने ओलांडला ७०० चा टप्पा...
◼️ सातारा जिल्ह्यात सर्वाधिक मागणी ज्वाला मिरचीला असते.
◼️ तर कश्मिरी बेडगी मिरचीचा किलोचा दर आता ७५० ते ८०० पर्यंत गेला आहे.
◼️ तसेच इतर मिरचीच्या दरातही मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
मिरची येते कोठून?
◼️ सातारा जिल्ह्यात स्थानिक मिरची कमी राहते; पण, आंध प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून मिरचीची आवक होते. आंध्र प्रदेशातून ज्वाला, लवंगी आणि गुंटूर मिरची येते.
◼️ कर्नाटकातून संकेश्वरी, बेडगी ३ आणि कश्मिरी बेडगीची आवक होते. या मिरची उत्पादक राज्यातच गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उत्पादन ४० टक्के घटले आहे.
बाजारातील मिरची दर
प्रकार - २०२५ (२०२६)
१) लवंगी - १४० (२३०-२४०)
२) संकेश्वरी - १५० (२८०-३००)
३) बेडगी - २२० (३८०-४००)
४) कश्मिरी बेडगी - ३८० (७५०-८००)
खोबरे ३५० रुपये किलो
◼️ मसाल्याचीही गरज असते. लवंग, दालचिनी, जिरे, मिरे, रामपत्र, बादल फूल, तमालपत्र, धने आदी मसाला लागतो.
◼️ हा मसाला कर्नाटक, केरळ तसेच गुजरात राज्यातून येतो; पण मसाल्याच्या दरातही ३० टक्के वाढ झालेली आहे.
◼️ तर खोबरे दरातही ५० टक्के वाढ आहे. मागील वर्षी खोबरे १८० रुपये किलो होते. आता ३५० रुपयांपर्यंत दर गेला आहे.
जिल्ह्यात आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून लाल मिरची येते; पण गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उत्पादनात घटले. सध्या नवीन मिरचीची आवक सुरू असली तरी जेमतेम आहे. मिरचीच्या दरात वाढ झालेली आहे. दर कमी होण्याची शक्यता कमी आहे. तर एप्रिल-मे महिन्यांत मिरचीचा दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे; तसेच दरातही वाढ झालेली आहे. - मोहसीन बागवान, विक्रेता, सातारा
अधिक वाचा: रेशनवर नक्की तांदूळ मिळणार की मका? कोणत्या कार्डधारकांना मिळणार किती धान्य?
