धुळे : लोणचे, कँडी, मुरब्बासाठी आवळ्याची मागणी वाढली आहे. साधारणतः ७५ रुपये किलो दराने त्यांची विक्री होत आहे. आठवडाभरात मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आवळ्याला 'क' जीवनसत्त्वाचा खजिना म्हणतात. दिवाळीच्या आधी आवळे बाजारात येण्यास सुरुवात होते. दिवाळीसह सण उत्सव आटोपले की, साधारणतः गृहिणी डिसेंबर महिन्यात आवळ्यापासून विविध खाद्य पदार्थ तयार करतात. हे पदार्थ वर्षभर टिकतात तसेच आहारतज्ज्ञांच्या मते आवळ्याला शिजवले तरी त्यातील 'क' जीवनसत्त्व कमी होत नाही.
त्यामुळे गूळ किंवा साखरेच्या पाकात आवळे शिजवून मुरब्बा, कँडी, आले व आवळे एकत्रित बारीक करून त्याचा रस, हिरवी मिरची घालून आवळ्याचे लोणचे, आवळा किसून त्यात हिरव्या मिरच्या बारीक करून ठेचा असे विविध प्रकार आवळ्यापासून तयार केले जातात. यासाठी किमान चार ते पाच किलो आवळ्यांची सहज खरेदी केली जाते.
आवळ्यात 'क' जीवनसत्त्व
हिवाळ्यात साधा आवळा किंवा खाद्य पदार्थाच्या माध्यमातून होणारे सेवन शरीरासाठी आरोग्यदायी आहे. या फळात सर्वाधिक प्रमाणात 'क जीवनसत्त्व असते. त्यापासून विविध खाद्य पदार्थ बनवले तरी ते कायम राहते. म्हणूनच या फळास बहुगुणी असे म्हणतात. हिवाळ्यात आवळ डिसेंबर महिन्यात आवळ्यापासून तयार केलेले विविध पदार्थ वर्षभर घरात चवीनुसार खाण्यासाठी उपब्लध असतात
घरीच बनवले जाते च्यवनप्राश
काही गृहिणी घरीच आवळ्याचे च्यवनप्राशही बनवतात. आवळा हा तुरट, आंबट असला तरी त्यात गूळ, साखर, तिखट घालून विविध पदार्थ बनवले की त्याच्या सेवनाने तोंडाला चव येते. शरीरासाठी पोषक, गुणकारी असल्याने आवळा वर्षभर विविध पदार्थांच्या स्वरूपात खाण्यास प्राधान्य देतो. त्वचा, केसही आवळ्याने व्यवस्थित राहतात. महिला बचत गटातर्फे देखील आवळ्यापासून तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत.
गृहोद्योग, महिला बचत गट, गृहिणींकडून मोठ्या प्रमाणात खरेदी
आवळ्याची आवक वाढली असून संक्रांतीपर्यंत आवळ्याचा हंगाम असतो. या कालावधीत शहरात सर्वाधिक आवळा लागतो. गृहोद्योग, महिला बचत गट, गृहिणींकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. त्यामुळे दररोज सर्व आवळा सहज विकला जातो. फारच कमी कालावधीत उपलब्ध राहत असल्याने त्याला मागणीही जास्त असते.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात