प्रत्येक फळाला एक हंगाम असतो. त्याचकाळात ती उपलब्ध होत असतात अन् त्यावेळी त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी ही पोषक असते. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापुरात सध्या सफरचंद व सीताफळांचा हंगाम असून दोन्ही फळांची आवक वाढली आहे.
रस्त्याच्या कडेला विकण्यात येत असलेली सीताफळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आवक वाढली असली तरी दर अद्यापही थोडे महाग आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीताफळांची उत्पादन व आवक वाढल्याने विक्रेतेही वाढले आहेत. सध्या सीताफळाचा भाव आकारानुसार प्रतिकिलो १०० ते १२० रुपये आहे.
रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक व प्रवासी थांबून सीताफले विकत घेत असल्याचे दिसत आहे. थेट शेतातील ताजी फळे मिळत असल्याने सध्या सीताफळांना मागणीही वाढली आहे. अबालवृद्धांचे आवडते फळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीताफळांचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो.
अमरावती जिल्ह्यातून आवक
अकोला जिल्हा बाजूच्या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. या परिसरात सीताफळांच्या मोठ्या बागा आहेत. तेथील स्थानिक शेतकरी स्वतःच्या शेतातील सीताफळे विक्रीसाठी आणत आहेत.
तर बहुतांश विक्रेते बाग मालकांकडून सीताफळांची खरेदी करून मूर्तिजापूर परिसरात विकत आहेत. या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. रोज सकाळी गावातून दुचाकी वा बसमधून सीताफळे आणून ती दिवसभर विकली जात आहेत.
गेली अनेक वर्षे माझ्यासह गावातील बहुतांश लोक सीताफळ विक्रीच्या व्यवसायात आहेत. यंदा पीक चांगले आले असून सध्या तोडणी सुरू आहे. येत्या काळात आवक आणखी वाढणार आहे. - अब्दुल सईद अब्दुल रशीद, फळविक्रेता, मूर्तिजापूर.
मधापुरी ग्रामपंचायतीच्या पाच एकर शेतात सीताफळाच्या दोन हजार झाडांची लागवड केली असून, दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पादन होत आहे. सीताफळाची विक्री शेतातून व मार्केटमध्ये केल्या जाते. - प्रदीप ठाकरे, माजी सरपंच, मधापुरी.
राज्यातील सीताफळ आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
12/10/2025 | ||||||
पुणे-मांजरी | --- | क्विंटल | 13 | 2000 | 4000 | 3000 |
पुणे | लोकल | क्विंटल | 1143 | 1000 | 7500 | 4200 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 19 | 4000 | 6000 | 5000 |