पारनेर : बाजार समितीच्या आवारात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर कांदा गोण्यांची आवक वाढत चालली आहे. संगमनेर, जुन्नर, शिरूर, श्रीगोंदा, नगर तालुक्यातील कांदा उत्पादकांची पारनेरला पसंती दिसत आहे.
गेल्या १५ दिवसांत ४ हजार मालट्रक कांदा गोण्यांची आवक झाल्याने तिसऱ्यांदा लिलाव रद्द करावे लागले. रविवारी (दि.११) बाजार समितीच्या आवारात ९४ हजार ४३६ कांदा गोण्याची आवक झाली.
शेतीमालाला मिळणारा रास्त भाव व पारदर्शक कारभारामुळे कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी आपला माल विक्रीसाठी आणत असल्याचे सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव यांनी सांगितले.
गेल्या १५ दिवसांत जवळपास दर लिलावात ५० हजारांवरून ९४ हजार कांदा गोण्यांची आवक पार झाली. बाजार समितीत जागेची व हमालांची कमतरता, तसेच आवक वाढल्याने एवढ्या गोण्या उचलणे शक्य नसल्याने लिलाव मात्र पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.
रविवारी झालेल्या लिलावात ५ ते १० वक्कलला १८ ते २० रुपये किलोंचा भाव मिळाला. १ नंबर वक्कलला १४ ते १७ रुपये, २ नंबर वक्कलला ११ ते १३ रुपये, ३ नंबर वक्कलला ६ ते १० रुपये भाव मिळाल्याची माहिती माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी दिली.
महिनाभराची कांद्याची आवक, कंसात ट्रकची संख्या
१४ डिसेंबर - ४० हजार ५१४ गोण्या (२१० ट्रक)
१७ डिसेंबर - ६३ हजार ४६२ गोण्या (३३२ ट्रक)
१९ डिसेंबर - ४८ हजार ५३९ गोण्या (२५८ ट्रक)
२४ डिसेंबर - ४८ हजार ९८६ गोण्या (२५९ ट्रक)
२६ डिसेंबर ५७ हजार ९२६ गोण्या (३०५ ट्रक)
२८ डिसेंबर - ६९ हजार ४२१ गोण्या (३६६ ट्रक)
३१ डिसेंबर - ७८ हजार ८३८ गोण्या (४१९ ट्रक)
४ जानेवारी - ९२ हजार ४६७ गोण्या (४२२ ट्रक)
७ जानेवारी - ९३ हजार ३५३ गोण्या (४९७ ट्रक)
११ जानेवारी - ९४ हजार ६०३ गोण्या (५०४ ट्रक)
राज्यात कांदा विक्रीसाठी पारनेर बाजार समिती प्रसिद्ध आहे. पारदर्शक कारभारामुळे शेतकरीवर्गाबाबत विश्वास निर्माण झाला आहे. कांदा खरेदी-विक्रीतून आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असून, त्याचा फायदा बाजार समितीला झाला आहे. त्यामुळे बाजार समितीकडे ४ कोटी ५० लाख रुपयांच्या मुदत ठेवी झाल्या आहेत. - किसनराव रासकर, सभापती, पारनेर
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने वीजपुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय घेत बाजार समितीच्या छतावर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत सोलर प्रकल्प उभारून दरमहा येणारा ६० हजार वीजबिलात मोठी बचत केली. पारदर्शक कारभारामुळे बाजार समिती नफ्यात आली. त्याचबरोबर शेतकरी हिताला प्राधान्य देत सर्व सुख-सोयी पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. - बाबासाहेब तरटे, माजी सभापती
अधिक वाचा: आता तलाठ्यांकडचे हेलपाटे वाचणार; ई हक्कद्वारे 'या' ११ प्रकारच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध
