अक्षय तृतीयेचा मुहूर्त गाठण्यासाठी कोकणासह राज्यभरातून तब्बल ९४ हजार आंबा पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी या पेट्यांमुळे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला वाशी बाजारपेठेत आंब्याचा दरवळ सुटला आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा खाण्याची प्रथा आजही मोठ्या प्रमाणात पाळली जाते. त्यामुळे या दिवसासाठी आंब्याला मागणी वाढते. त्याची दखल घेत गेल्या काही दिवसात वाशी बाजारपेठेत पेट्यांची आवक वाढली आहे.
रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीला सुट्टी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी शनिवारीच मोठ्चा प्रमाणावर आंबा बाजारात पाठवला आहे.
शनिवारी (दि. १८) अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ९४ हजार आंबा पेटवा विक्रीला दाखल झाल्या. त्यापैकी ५८ हजार ८९४ पेट्या कोकणातील तर ३५ हजार ११२ पेट्या अन्य राज्यातील असल्याचे सांगण्यात आले.
यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कभी आहे. वाढत्या उष्म्यामुळे तयार होणारा आंबा काढून बागायतदार विक्रीसाठी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाठवत आहेत. या हंगामातील सर्वाधिक आवक शनिवारी झाली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.
सध्या आंबा पेटीला १,५०० ते ४,००० रुपये दर आहे. गतवर्षी याच वेळी ८० हजार कोकणातील आंबा पेट्या विक्रीला होत्या, शिवाय दर हजार ते तीन हजार रुपये एवढे होते. गतवर्षीच्या तुलनेत आंबा कमी आहे, त्यामुळे यावर्षी दर टिकून आहेत.
आंबा खाण्याचा मुहूर्त
वैशाख महिन्यात उष्णता असहा होते. आयुर्वेदानुसार शरीराला थंडावा देण्यासाठी आंबा खाणे गुणकारी म्हटले जाते. आंबा पूर्णपणे पिकेपर्यंत थांबण्याची परंपरा असल्याने अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्याची खरी सुरूवात मानली जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेला आंब्याला वाढती मागणी असते.
परराज्यातील आंब्याची आवक जोरात
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील हापूस, बदामी, केशर, लालबाग, तोतापुरी, नीलम या प्रकारचा आंबा वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे.
कर्नाटक हापूस ७० ते १५० रुपये, बदामी ५० ते ८० रुपये, केशर ८० ते १५०, लालबाग ५० ते ६०, तोतापुरी ५० ते ६० तर नीलम ६० ते ७० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.
गेल्या चार दिवसातील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक
• दि. १५ एप्रिल : महाराष्ट्र - ५०,६३८. अन्य राज्य - ३१,०९८०. एकूण - ८१,७३६.
• दि. १६ एप्रिल : महाराष्ट्र - ४९,७६४. अन्य राज्य - ३३,४६०. एकूण - ८३,२२४.
• दि. १७ एप्रिल : महाराष्ट्र - ५१,३८८. अन्य राज्य - ३१,२२०. एकूण - ८२,६०८.
• दि. १८ एप्रिल : महाराष्ट्र - ५८,८९४. अन्य राज्य ३५,११२. एकूण - २४,००६.
