Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातून ४०५ टन द्राक्ष निर्यात; आखाती देश व युरोपमध्ये प्रतिकिलो काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:16 IST

Grape Export 2025-26 २०२५-२६ हंगामात आतापर्यंत ४०५ टन द्राक्ष निर्यात आखाती देश, युरोपियन देशांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने यंदा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

अशोक डोंबाळेसांगली जिल्ह्यातून २०२५-२६ हंगामात आतापर्यंत ४०५ टन द्राक्ष निर्यात आखाती देश, युरोपियन देशांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने यंदा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

२०२४-२५ मध्ये जिल्ह्यातून पाच हजार ५२३.६६ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षाची निर्यात झाली होती; पण यावर्षी २०२५-२६ मध्ये केवळ तीन हजार ७२०.७७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे निर्यात होणार आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार ८०२ हेक्टरने निर्यात द्राक्षाचे क्षेत्र घटले आहे. द्राक्ष छाटणी झाल्यानंतर ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत निर्यात द्राक्ष बागांची नोंदणी कृषी विभागाकडून होती.

त्यानुसार २०२४-२५ या वर्षी १० हजार १४९ शेतकऱ्यांच्या पाच हजार ५२३.६६ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागांची नोंदणी झाली होती. गेल्यावर्षी १० हजार १४९ शेतकऱ्यांनी १७ हजार ८९७ टन द्राक्ष निर्यात केली होती.

तासगाव, खानापूर आणि जत तालुक्यांतून मुख्यत्वे निर्यात होते. यावर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

यावर्षी म्हणजे २०२५-२६ या वर्षात केवळ सात हजार ९० शेतकऱ्यांनी तीन हजार ७२०.७७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागांची नोंदणी केली आहे. आतापर्यंत केवळ ४०५ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आदी आखाती देशांत २१ कंटेनर, युरोपला ५ आणि रशियाला दोन कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात केली आहे.

दरही दर्जानुसार प्रतिकिलो १०० ते १९० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे निर्यातदारांनी सांगितले; पण द्राक्षाचे उत्पादन ४५ ते ५० टक्क्यांनी घटले आहेत.

निर्यातक्षम द्राक्षांमध्ये प्रामुख्याने थॉम्पसन सीडलेस, सुपर सोनाका, माणिक चमन, तास-ए-गणेश, शरद सीडलेस आणि फ्लेम सीडलेस, आरा ३५, आरा ३६ या वाणांच्या द्राक्षांना परदेशात सर्वाधिक मागणी असल्याचे निर्यातदारांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष निर्यातीमध्ये घट झाली आहे. आतापर्यंत तीन हजार ७२०.७७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र कमी आहे. आतापर्यंत २८ कंटेनरमधून ४०५ टन द्राक्षांची आखाती आणि युरोप देशात निर्यात झाली आहे. द्राक्षांच्या दर्जानुसार १०० ते १९० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. - प्रीतेश माळी, कृषी अधिकारी, सांगली

अधिक वाचा: १२ लाख टन सोयाबीन खरेदीचं आव्हान; सरकारच्या 'या' निर्णयामुळे खुल्या बाजारातील सोयाबीन दरात वाढ

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Grape Exports Dip: 405 Tons Shipped to Gulf, Europe

Web Summary : Sangli grape exports decline to 405 tons due to natural disasters. Gulf and Europe get shipments. Prices range from ₹100-190/kg based on quality. Thompson Seedless and other varieties are in high demand.
टॅग्स :द्राक्षेसांगलीशेतकरीशेतीफलोत्पादनबाजारमार्केट यार्डसौदी अरेबियापीकपाऊस