सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे पंचायतराज मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेने जाहीर केले आहे.
अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीत श्रद्धांजली वाहण्यात येऊन गुरुवारी (दि. ९) एक दिवस काम बंद आंदोलन करण्याचे परिषदेचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे, वरिष्ठ उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी जाहीर केले आहे.
या संदर्भातील निर्णय शासनाला कळविण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना ई मेलद्वारे याबाबत मागणी निवेदन दिले आहे.
सरपंच हा लोकसेवक असल्याबाबत तेलंगणा व राजस्थान उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाचाही निर्णय आहे. त्यानुसार सरपंचाच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पूर्वीचे भादंवि ३५३, आताचे भारत न्याय संहिता १३२ प्रमाणे गुन्हा नोंद व्हावा.
गावाच्या हितासाठी समाजसेवेत भाग घेणाऱ्या सरपंचांना व त्यांना मदत करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण अत्यावश्यक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
सरपंच परिषदेच्या शासनाकडे मागण्या
■ सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा असावा.
■ प्रत्येक ग्रामसभेला पोलिस संरक्षण अनिवार्य करण्यात यावे.
■ सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू व्हावी.
■ ग्रामसभा सर्व ग्रामस्थांसाठी असल्याने ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये इतरांना कायद्याने प्रतिबंध असावा.