ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटणाऱ्या महिला कार्यकर्त्यांसाठी शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा व सन्माननीय निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत गावपातळीवर कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) यांना आता "ग्रामसखी" या नवीन व गौरवास्पद नावाने ओळखले जाणार आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलनासाठी २०११ पासून केंद्र सरकारच्या मदतीने दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबवले जात आहे.
या अंतर्गत गरीब महिलांचे स्वयं सहाय्यता गट, ग्रामसंघ व प्रभागसंघ तयार करून त्यांना शाश्वत उपजीविका मिळवून दिली जाते.
या कामात गावपातळीवर विविध विषयांत मदत करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाप्रमाणे वेगवेगळी नावे होती.
उमेद कर्मचारी संघटनेने या सर्व महिलांना ग्रामसखी असे पदनाम देण्याची मागणी केली होती, जी आता शासनाने मान्य केली आहे.
शासनाच्या या निर्णयानुसार, आता विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सखींच्या नावापुढे 'ग्रामसखी' हा शब्द जोडला जाणार आहे.
सुधारित पदनामे पुढीलप्रमाणे
सध्याचे पदनाम : नवीन सुधारित पदनाम
१) CRP (प्रेरिका) : ग्रामसखी - प्रेरिका
२) बँक सखी : ग्रामसखी - बँक लिंकेज
३) पशु सखी : ग्रामसखी - पशुसंवर्धन
४) कृषी सखी : ग्रामसखी - कृषी विकास
५) मत्स्य सखी : ग्रामसखी - मत्स्य पालन
६) वन सखी : ग्रामसखी - वनउपज
७) आर्थिक साक्षरता सखी : ग्रामसखी - आर्थिक साक्षरता
'ग्रामसखी' या शब्दामुळे त्यांच्या कामातील आपलेपणा व सन्मान वाढण्यास मदत होईल. ग्रामीण विकासाच्या मुख्य प्रवाहात या महिलांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हेच या निर्णयावरून अधोरेखित होते.
ओळखपत्र व अंमलबजावणी
◼️ केवळ नाव बदलून शासन थांबलेले नाही, तर या सर्व महिलांना त्यांच्या नवीन पदनामासह 'उमेद' अभियानामार्फत नवीन ओळखपत्रे (ID Cards) देखील दिली जाणार आहेत.
◼️ या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश ग्राम विकास विभागाने दिले आहेत.
◼️ या निर्णयामुळे गावपातळीवर काम करणाऱ्या महिलांना एक नवी व एकसमान ओळख मिळेल.
अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावर आता पतीसोबत येणार पत्नीचेही नाव; काय आहे योजना? वाचा सविस्तर
