हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
अवकाळी पाऊस, नीचांक तापमान, उच्चांक तापमान, गारपिटीमुळे आंबा पिकाचे नुकसान झाल्यास परतावा देण्यात येतो. यावर्षी जिल्ह्यातील ३० हजार १३२ बागायतदारांनी फळपीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.
एकूण १४ हजार ३८३ हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला असून, त्यासाठी शेतकऱ्यांनी १९ कोटी ५६ लाख १५ हजार ६६४ रुपये भरले आहेत.
यावर्षी एकूण आंबा उत्पन्नच ३० टक्के राहिले आहे. अवकाळी पावसामुळे अति थंडीमुळे आंब्याचे नुकसान तर झाले, उच्चांक तापमानामुळे फळे भाजली, फळांवर काळे डाग पडले.
फळगळसुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली. त्यातच शेवटच्या टप्प्यातील आंबा काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसामुळे आंबा जमिनीवर आला.
वास्तविक आंबा हंगाम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो, यावर्षी आंबाच मुळात कमी होता आणि हंगामही जेमतेम महिनाभरच चालला. विमा कंपन्या दि. १५ मेपर्यंतच फळपिकाचे नुकसान ग्राह्य धरतात.
वेळोवेळी मागणी करुनही हंगामाचा कालावधी ३० मेपर्यंत ग्राह्य धरला जात नाही. यावर्षी दि. १५ मेपूर्वीच आंबा संपला आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांकडून निकषांची अंमलबजावणी केली जाईल का? असा प्रश्न बागायतदारांना पडला आहे.
ट्रिगर अॅक्टिव्हेट होत नसल्याने नुकसान- जिल्ह्यातील महसूल मंडळात तापमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. या यंत्राव्दारे हवामानातील बदल टिपले जातात.- परंतु अनेकवेळा हवामानातील बदल टिपण्यास यंत्र अकार्यक्षम ठरतात व ट्रिगर अॅक्टिव्हेट होत नाही. परिणाम आंबा बागायतदारांचे नुकसान होत आहे.- ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक गावागावातून स्वयंचलित तापमापक यंत्र बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र ग्रामपंचायत स्तरावर जागांची उपलब्धता न झाल्यामुळे स्वयंचलित हवामान यंत्राचा प्रस्ताव अद्याप रखडला आहे.- परिणाम हवामानातील बदल योग्यवेळी टिपले न गेल्यामुळे बागायतदारांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी बदल न टिपल्यामुळे परतावा रक्कम बागायतदारांना देण्यात न आल्याने नुकसान झाले आहे.
४५ दिवसात परतावा अपेक्षित- आंबा हंगाम संपल्यानंतर बागायतदारांना ४५ दिवसात परतावा जाहीर करून बागायतदारांच्या खात्यात परताव्याची रक्कम जमा करणे आवश्यक आहे.- मात्र विमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे तसेच शासनाकडून हप्त्याचे पैसे वेळेवर मिळत नाही.- तीन ते चार महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर परतावा जाहीर केला जातो.- पुढे पैसे जमा करताना दिरंगाई केली जात असल्यामुळे बागायतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
अधिक वाचा: अंदमानात मान्सूनचे आगमन; राज्यात या जिल्ह्यांत वेगाच्या वाऱ्यासह अवकाळी बरसणार