यावर्षीच्या हंगामात उसाला दर विनाकपात ३७५१ रुपये मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार केला असून, शुक्रवारी जरंडेश्वर कारखान्यासमोर आंदोलन केले. यावेळी कारखाना व्यवस्थापनाने सोमवारपर्यंत मुदत मागितली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
तर कराड तालुक्यातील दोन कारखान्यांनी ३५०० रुपये दर जाहीर करून कोंडी फोडली आहे. आता सोमवारी साताऱ्याचे जिल्हाधिकारी हे कारखानदार आणि शेतकरी संघटनांची बैठक घेणार असून, त्यानंतरच जिल्ह्यातील इतर कारखानेही किती दर देणार, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
सातारा जिल्ह्यात खासगी आणि सहकारी मिळून एकूण १७ साखर कारखाने आहेत. या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. राज्य शासनाने हंगाम सुरू करण्यासाठी १ नोव्हेंबरपासून परवानगी दिली होती; पण प्रत्यक्षात दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धातच धुराडी पेटल्यानंतर ऊसतोड मजूर आले होते.
कारखानादारांबरोबर सोमवारी बैठक; अंतिम तोडगा निघणार का?
• सातारा जिल्ह्यातील ऊस दराचे आंदोलन वाढत असताना प्रशासनाने हालचाली वाढविल्या आहेत. यासाठी सोमवार, दि. १७ रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे.
• यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, तसेच साखर कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक हे सहभागी होणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो, यावर आंदोलनाची पुढील दिशा अवलंबून असणार आहे.
