विवेक चांदूरकर
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील तीन नव्या व तीन जुन्या पीक वाणांना देशपातळीवर अधिसूचना प्राप्त झाली असून, त्याचा थेट लाभ देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे.
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पीक गुणवत्ता वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या ९३ व्या बैठकीत या वाणांना मान्यता देण्यात आली.
नवीन वाणांमध्ये गहू वाण एकेएडब्लू ५१००, पिवळी खरीप ज्वारी सीएसव्ही ६५ यलो आणि हरभरा वाण सुपर जॅकी (एकेजी १४०२) यांचा समावेश आहे. हे वाण अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक व हवामानसहनशील आहेत, तर सोयाबीनच्या पीडीकेव्ही अंबा व पूर्व आणि भुईमूग वाण टीएजी ७३ या वाणाच्या क्षेत्रवाढीसही देशव्यापी मान्यता मिळाली आहे.
संशोधकांचा सन्मान
या संशोधनामागे गहू, ज्वारी, हरभरा, भुईमूग आणि सोयाबीन पिकांचे पैदासकार डॉ. स्वाती भराड, डॉ. आर. बी. घोराडे, डॉ. अर्चना थोरात, डॉ. मनीष लाडोळे आणि डॉ. सतीश निचळ यांचे योगदान आहे. कुलगुरू डॉ. शरद गडाख व संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी संशोधकांचा सन्मान केला आहे.
शाश्वत शेती व संपन्न शेतकरी या ब्रिदाने कार्यरत विद्यापीठ नव्या वाणांद्वारे शेतकऱ्यांना फायदेशीर शेतीची दिशा देत आहे. विद्यापीठाच्या सल्ल्याने शेतीचे नियोजन लाभदायक ठरणार आहे. - डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंदेकृवि, अकोला.
• नवीन अधिसूचित वाण
गहू - एकेडब्ल्यू-५१०० : उच्च उत्पादनक्षम, तांबेरा रोगास प्रतिकारक, उष्णतेस असंवेदनशील, ब्रेड व चपातीसाठी उपयुक्त. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व तामिळनाडूसाठी वेळेवर पेरणीसाठी प्रसारित.
पिवळी ज्वारी-सीएसव्ही ६५ यलो : जैव संपृक्त, जस्त (२३.२ पीपीएम) व लोह (३०.८ पीपीएम) समृद्ध, प्रथिनांचे प्रमाण १०.४ टक्के, ११०-११२ दिवसांत परिपक्व, धान्य उत्पादन २५-२८ क्विंटल प्रतिहेक्टर.
हरभरा - सुपर जॅकी (एकेजी १४०२) : २०७३ क्विं./हे उत्पादनक्षम, ९८ दिवसांत परिपक्च, मर रोगास मध्यम प्रतिकारक, यंत्र सुलभ काढणी योग्य.
• प्रसार क्षेत्र वाढलेले वाण
सोयाबीन - पिडीकेव्ही अंबा (एएमएस १००-३९) : लवकर परिपक्व (९४-९६ दिवस), मुळकुज व खोडकुज रोगास प्रतिकारक. पूर्वी मध्य भारतासाठी अधिसूचित; आता गुजरातसाठीही मान्यता.
सोयाबीन - पिडीकेव्ही पूर्वा (एएमएस २०१४-१) : २२-२६ क्विं./हे उत्पादन, १०५-१०७दिवसांत परिपक्व. आता आसाम, मेघालय व दक्षिणपूर्व मध्य प्रदेशसाठी मान्यता.
भुईमूग - टीएजी ७३ (टीएजी १४-७३) : २५-२८ क्विं./हे शेंग उत्पादन, ७३-७४ टक्के दाण्याचा उतारा, ४८-४९ टक्के तेल. पूर्वी विदर्भासाठी अधिसूचित; आता गुजरातसाठीही प्रसारित.