जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या कापूस शेतीला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ५ हजार ६५९ कोटी रुपयांच्या 'कॉटन प्रॉडक्टिव्हिटी मिशन' या योजनेमुळे भविष्यात चांगला फायदा मिळण्याची शक्यता जिल्ह्यातील कॉटन बाजारातील जाणकारांसह काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्यासोबतच जिल्ह्यातील कापसाला नवी झळाळी मिळू शकणार आहे. जिल्ह्यात सध्या कापसाची उत्पादकता मर्यादित आहे. त्यात मजुरांची टंचाई, अनिश्चित भात, यामुळे गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्रात घट झाली आहे.
त्यात कापूस लागवडीवर खर्च करून देखील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत नाहीय, गेल्या तीन वर्षाचा विचार केला. तर, जिल्ह्यातील कापसाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांची घट झाली आहे.
कापूस हे आमच्यासाठी केवळ पीक नसून, जगण्याचा आधार आहे. पण, दरवर्षी बोंडअळी आणि वाढत्या खर्चामुळे आम्ही हवालदिल होतो. या मिशनमुळे आम्हाला नवीन तंत्रज्ञान आणि अतिघन लागवड पद्धत शिकायला मिळेल. जर हेक्टरी उत्पादन वाढले शेतकऱ्याचे दिवस नक्कीच बदलतील. - भास्कर खंडू पाटील, कापूस उत्पादक शेतकरी, आडगाव, ता. चोपडा.
हे परिणाम होतील...
• अतिघन लागवड : जळगाव जिल्ह्यात कोरडवाहू कापूस मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. या मिशनअंतर्गत 'हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम'वर (अतिघन लागवड) भर दिला जाणार आहे. यामुळे सध्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी जागेत जास्त झाडे लावून हेक्टरी उत्पादन १० ते १५ क्विंटलवरून थेट २५ ते ३० क्विंटलपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
• बोंडअळीचा नायनाट: जळगाव जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी गुलाबी बोंडअळीमुळे संकटात सापडतात. या मिशनमध्ये कमी कालावधीत येणाऱ्या आणि कीड-प्रतिबंधक वाणांच्या बियाण्यांचे वाटप केले जाईल. यामुळे फवारणीचा खर्च कमी होईल.
• 'कस्तुरी' बँडिंग : केंद्र सरकार भारतीय कापसाला 'कस्तुरी कॉटन भारत' या ब्रँडने जागतिक बाजारपेठेत उतरवत आहे. जळगावमधील जिनिंगमध्ये तयार होणाऱ्या कापूस गाठी आता या प्रीमियम ब्रँडखाली विकल्या जातील. यामुळे जागतिक वस्त्रोद्योग कंपन्या थेट देशासोबतच जळगावच्या कापसाला पसंती देतील, ज्याचा फायदा दरामध्ये दिसून येईल.
• जिनिंग आणि प्रेसिंग उद्योगाचे आधुनिकीकरण : जळगाव जिल्ह्यात शेकडो जिनिंग आहेत. या मिशनमध्ये प्रक्रिया उद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधीची तरतूद आहे. यामुळे कापसाची प्रत सुधारून जिल्ह्याला 'फार्म टू फॅशन' या साखळीचा मोठा फायदा मिळेल.
पाच वर्षांच्या या दीर्घकालीन योजनेमुळे कापूस क्षेत्रात मोठी क्रांती होईल. विशेषतः खान्देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे आणि नवीन तंत्रज्ञान मिळाल्यास उत्पादकता वाढेल. तसेच, जिनिंग उद्योगाच्या आधुनिकीकरणामुळे दर्जेदार धागा निर्मिती होऊन कापसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळेल. हे मिशन कापूस उत्पादक आणि प्रक्रिया उद्योग या दोन्ही घटकांसाठी आशादायक आहे. - प्रदीप जैन, संस्थापक अध्यक्ष, खान्देश जिनिंग असोसिएशन.
हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक
