यंदा अजूनही पावसाळा सुरू असल्याने थंडी लांबणार आहे. तशी शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हिवाळ्यातील थंडी जशी शरीराला थरथरवते, तशीच ती आपल्या हृदयालाही आव्हान देते.
या काळात शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे झोपेतून अचानक ताडकन उठून उभे राहिल्यास काही सेकंदांसाठी मेंदू आणि हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा थांबतो.
यातून चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, असा इशारा हृदयविकार तज्ज्ञांनी दिला आहे.
हिवाळ्यातील थंडीमुळे शरीराचे तापमान राखण्यासाठी रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो, रक्त अधिक घट्ट होते आणि हृदयाला ते शरीरभर पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे हृदयावर ताण वाढतो.
वृद्ध व्यक्ती, हृदयरुग्ण, मधुमेहींमध्ये याचा परिणाम जास्त दिसून येतो. रात्री झोपेत शरीराचा रक्तदाब आणि हृदयाची गती कमी झालेली असते. अशा वेळी झोपेतून अचानक उठून उभे राहिल्यास रक्त त्वरित मेंदूपर्यंत पोहोचत नाही.
काही क्षणांसाठी मेंदूतील रक्तपुरवठा कमी झाल्याने चक्कर, डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा बेशुद्ध पडणे, अशी लक्षणे दिसू शकतात. तज्ज्ञांच्या मते, झोपेतून उठताना घाईगडबड करू नये.
झोपेतून उठताना घाईगडबड नको
◼️ आधी बाजूला वळून काही सेकंद शांत राहावे.
◼️ नंतर हातपाय हलवून हळूहळू बसावे आणि नंतर उभे राहावे.
◼️ यामुळे रक्ताभिसरण हळूहळू वाढते आणि मेंदू-हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होतो.
◼️ मेंदू सतत ऑक्सिजनयुक्त रक्तावर अवलंबून असतो.
◼️ झोपेतून ताडकन उठल्याने काही क्षणांसाठी मेंदूला रक्तपुरवठा थांबतो.
हृदयावर ताण आल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक
थंडीत रक्त घट्ट होते आणि रक्तदाब वाढतो. अशा वेळी हृदयावर अधिक कामाचा ताण येतो, ज्यामुळे रक्तपुरवठा अडथळलेला असल्यास हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो.
काळजी घेणे गरजेचे
◼️ अशा रुग्णांमध्ये खत्ताभिसरण नियंत्रित राहणे आणखी महत्त्वाचे असते.
◼️ थंडीत सकाळच्या वेळी अचानक बाहेर पडू नये.
◼️ गरम कपडे घालावेत व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैली ठेवा.
◼️ हिवाळ्यात शक्यतो सूर्यप्रकाश असताना चालावे.
◼️ मॉर्निंग वॉक नेहमी रिकाम्या पोटी करावे.
◼️ आपल्या आहारात सलँडचा समावेश करावा.
◼️ बाहेर जाणं टाळत असाल तर, योग किंवा व्यायाम करा.
या गोष्टींची काळजी घेतल्यास रक्ताभिसरण वाढेल आणि शिरा आकसण्याचा धोका कमी होईल.
अधिक वाचा: तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे का? हे ऑनलाईन कसे चेक कराल? वाचा सविस्तर
