उन्हाळा संपून पावसाळा सुरू होताना किंवा पावसाळा संपून हिवाळा प्रारंभ होताना अथवा हिवाळा गेल्यावर उन्हाळा सुरू होताना हवामानात बदल होत असतात.
यामुळे काही लोकांना सर्दी, ताप किंवा ॲलर्जीचा त्रास होतो. असे का घडते, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तापमानात घट आणि हवेच्या आर्द्रतेतील बदल विषाणूंना वाढण्याची संधी देतात.
बदलत्या तापमानाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया रोगप्रतिकारक शक्तीवर दबाव आणते, ज्यामुळे विषाणू आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो. म्हणूनच हवामान बदलत असताना लोक आजारी पडतात. जेव्हा हवामान बदलते तेव्हा शरीराला नवीन तापमान आणि वातावरणाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो.
या काळात, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे विषाणू आणि जीवाणू शरीरावर हल्ला करतात. तापात चढ उतार आणि सर्दी, खोकला, फ्लू, ॲलर्जी, घसा आणि त्वचेचे संक्रमण यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.
लक्षणे कशी ओळखाल?
• वाहणारे किंवा बंद नाक.
• घसा दुखणे किंवा खवखवणे.
• खूप ताप आणि थकवा.
• शरीर दुखणे, अशक्तपणा.
• डोळे जळजळणे
• पोटदुखी किंवा उलट्या होणे.
• श्वास घ्यायला त्रास होणे.
आजारी पडू नये म्हणून ...
• व्हिटॅमिन 'सी'ने समृद्ध पदार्थ खा.
• व्हिटॅमिन 'डी' व बी-१२ युक्त आहार घ्या.
• स्वच्छ आणि कोमट पाणी प्या.
• सकाळची, संध्याकाळची थंडी टाळा.
• बर्फाच्या पदार्थांचे सेवन करू नका.
• कुलर, एसीचा वापर करू नका.
• हातांच्या स्वच्छतेची काळजी घ्या.
• किमान अर्धा तास व्यायाम करा.
