भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाल्यानंतर अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला बाजारात विशेष ओळख मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साहही वाढला होता. यंदा याच उत्साहातून लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. मागील वर्षी २२१ हेक्टरवर असलेली लागवड यंदा तब्बल ३१६ हेक्टरपर्यंत पोहोचली.
मात्र, निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. यंदा कांदा तयार होण्यासही उशीर झाला असून, उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांची घट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहेत. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने कांदा लागवडीवर विपरित परिणाम झाला.
सुरुवातीला पेरणी उशिरा झाली आणि नंतर पिकाच्या वाढीच्या टप्प्यात हवामानातील बदलांचा फटका बसला. काही भागांत अनियमित पाऊस, तर काही ठिकाणी उष्णतेचा ताण यामुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही घसरले. शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना करून पीक वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. कांदा बाजारात आला असला तरी उत्पादन घटल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे पुढील काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यत आहे.
जीआय टॅगमुळे आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. लागवडही वाढवली, पण हवामानाने साथ दिली नाही. उत्पादन कमी झाल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे. - प्रदीप पाटील, शेतकरी.
बाजारात दर ३०० रुपयांपर्यंत
• यंदा उत्पादनात घट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिणामी, बाजारात पांढऱ्या कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. मागणी मात्र वाढलेली असल्याने दरात मोठी वाढ दिसून येत आहे.
• सध्या काही बाजारपेठांमध्ये कांद्याची विक्री २०० रुपये प्रतिमाळ दराने होत आहे, तर काही ठिकाणी हा दर २५० ते ३०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कांद्याच्या आकारानुसार दर निश्चित केले जात असून, मोठ्या आकाराच्या कांद्याला अधिक भाव मिळत आहे.
तुटवडा निर्माण होण्याची भीती
सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास पुढील महिन्यात बाजारात पांढऱ्या कांद्याचा तुटवडा अधिक तीव्र होऊ शकतो. त्यामुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम ग्राहकांवरही होणार असून, स्वयंपाकघराचा खर्च वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
