Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक युद्धाचा केळी निर्यातीवर काय होतोय परिणाम? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:15 IST

Banana Export : देशातच नव्हे तर विदेशातही मागणी असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर येथील केळीच्या निर्यातीवर युद्धाचा परिणाम झाला आहे.

भारत-पाक युद्धामुळे देशातील विविध भागांतून होणाऱ्या शेतमालाच्या आयात निर्यातीवर परिणाम झाला आहे. देशातच नव्हे तर विदेशातही मागणी असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर येथील केळीच्या निर्यातीवर युद्धाचा परिणाम झाला आहे. येथील केळी समुद्रमार्ग जहाजाने दुबईला पाठविण्यात येते. त्यानंतर ती इराक, इराण, ओमान आदी देशांत निर्यात होते.

परंतु मागील काही दिवसांपासून केळीची निर्यात बंद असल्याने केळीच्या दरात घसरण झाली आहे. यंदा मालेगाव, दाभड व अर्धापूर या तीन मंडळांत मोठ्या प्रमाणात केळीची लागवड झाली आहे. येथील केळी आकाराने मोठी, लांब आणि चवीला गोड आहे. त्यामुळे या केळीला विदेशात मागणी आहे. मात्र, भारत-पाकिस्तान युद्धामुळे केळीची निर्यात ठप्प झाली आहे.

परिसरात एक महिन्यापासून केळीच्या काढणीस सुरुवात झाली आहे. सुरुवातीला १६०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळू लागला होता. आणखी दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, युद्धामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्याच्या परिस्थिती केळीला १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

विदेशात जाणाऱ्या केळीला २५०० भाव

• मागील वर्षात मोठ्या प्रमाणात विदेशात केळीची निर्यात झाली होती. नांदेड येथील व्यापाऱ्यांच्या मदतीने लाखो टन केळीची निर्यात करण्यात आली होती.

• बाहेर देशात जाणाऱ्या केळीला २ हजार ४०० ते २ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता.

• सध्या भारतातील दिल्ली, हरयाणा, पंजाब, चंडीगड, श्रीनगर येथे पाठवली जात आहेत. तसेच राज्यातील अनेक भागांत केळीची निर्यात होत आहे.

• शेतकऱ्यांना आशा आहे की पुढील काळात अशी परिस्थिती राहणार नाही. विदेशात केळीची निर्यात सुरळीत सुरू होईल आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल.

हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

टॅग्स :केळीभारतभारतपाकिस्तानशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डनांदेडमराठवाडा