वारणानगर : तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याने गळितास येणाऱ्या उसास रुपये ३५४४ इतका दर जाहीर केला असून जाहीर केलेल्या दरापैकी ३४२५ रुपये प्रमाणे पहिला हप्ता व गळीत हंगाम समाप्तीनंतर ११९ प्रमाणे अदा केला जाणार आहे.
त्यानुसार वारणा कारखान्याकडे पहिल्या पंधरवड्यात गळितास आलेल्या ३४२५ प्रमाणे संबंधित सभासदांच्या खात्यावर ऊस बिल जमा केली आहे, अशी माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
वारणा कारखान्याने मशिनरीमध्ये काही तांत्रिक बदल केलेले असल्याने कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने गळीत करत असून कारखान्याची तांत्रिक कार्यक्षमता अतिशय चांगली आहे.
कारखान्याचा वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहे त्याप्रमाणे डिस्टिलरी प्रकल्प प्रतिदिनी १ लाख लिटरने चालू आहे.
सिरपपासून इथेनॉल पुरवठ्याचे ९३ लाख लिटरचे टेंडर मंजूर झाले असून कारखान्यामार्फत आजअखेर १६ लाख ७६ हजार इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना केला आहे.
सर्व ऊस उत्पादक सभासद, वाहतूकदार मालक व कारखान्याचे कामगार यांनी सहकार्य करून सर्व ऊस वारणा कारखान्याला द्यावा व कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य करावे.
असे आवाहन डॉ. विनय कोरे, उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक शहाजीराव भगत यांनी केले.
अधिक वाचा: साखर आयुक्तांचा नवा आदेश; उसतोडीसाठी टाळाटाळ केली तर शेतकऱ्यांना 'इथे' करता येणार तक्रार
