काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी १० रुपये प्रति किलो २ टन काजू बी उत्पादनापर्यंत अनुदान दिले जाईल. त्यासाठी सात बारावरील काजू लागवड पिक पाहणी नोंद असलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी शासनातर्फे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
त्यासाठी ३०० कोटीचा निधी मंजूर केल्याची घोषणा रत्नागिरी येथील एका जाहीर सभेत गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १ टन म्हणजे १ हजार किलो असून २ हजार किलो पर्यंत १० रुपये प्रति किलो दराने २० हजार रुपये पर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.
कोकणातील काजू उत्पादनाला भावांतर योजनेअंतर्गत प्रति किलो ५० रूपये अनुदान स्वरूपात देण्यात यावे. अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.
दर निश्चिती नसल्याने बसतोय फटका
- सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व कोल्हापूर जिल्ह्यातील कोकणाशी संबंधित भागात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. काही गावातून पुर्वजांनी लागवड केलेल्या काजूचे उत्पन्न घेत अनेक कुंटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर होतो आहे.
- तसेच कोकण कृषी विद्यापिठाच्या नवनविन संशोधनातून काजूच्या नवनविन जाती निर्माण होत आहेत. वेंगुर्ले ७, वेंगुर्ले ४ या नावाच्या काजू "बी" ची मोठी लागवड करण्यात आली आहे. अल्पकाळात अधिक उत्पादन देणाऱ्या या काजूच्या जाती आहेत.
- कोकणातील काजूवर प्रकिया उद्योगाची उभारणी झाली आहे. परंतु दुर्दैवाने आजपर्यंत काजू 'बी' ला महाराष्ट्र राज्य सरकारने हमीभाव ठरवून दिलेला नाही. गोवा राज्यांमध्ये तेथील सरकारने काजू बीला १५० रूपये किलोचा हमीभाव जाहिर केला आहे.
- कोकणातील काजू "बी" च्या दरामध्ये दरवर्षीप्रमाणे अस्थिरता असल्याने काजू बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. काजू 'बी' चा दर निश्चित नसल्याने काजू व्यापारी जो योग्य वाटेल त्या दरात काजू खरेदी करतात.