शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणाऱ्या उसासाठी प्रथम ऊसबिल हप्ता म्हणून ३१०० रुपये प्रतिमेट्रिक टन अदा केला आहे.
उर्वरित प्रतिटन किमान १०० रुपये प्रतिटन दराने दिवाळीपर्यंत दिला जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन संदीप तौर यांनी दिली.
जातेगाव बुद्रुक, तालुका शिरूर येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लिमिटेडने चालू २०२५-२६ या गाळप हंगामात सुमारे २.७० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.
हा कारखान्याचा १५वा ऊस गाळप हंगाम आहे आणि शिरूर, हवेली, दौंड व खेड तालुक्यांमधील उस उत्पादक शेतकरी इथे उस पुरवठा करतात.
दरम्यान, नुकत्याच महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार, पुणे जिल्हा वैधमापन शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने कारखान्यावर अचानक भेट दिली.
भेट देऊन वजन काटा तपासणी केली. त्यात वापरलेले सर्व वजन काटे प्रमाणित, सीलबंद आणि बिनचूक असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
या तपासणीबाबत पुणे वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक आर. ई. गवंडी आणि चिंचवड वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक आर.एस. परदेशी यांनी वजन काटे अचूक असल्याचा निर्विवाद अहवाल कारखाना प्रशासनास दिला.
चेअरमन संदीप तौर यांनी सांगितले की, शेतकरी हितासाठी कारखान्याचे सर्व कामगार व संचालक मंडळ कार्यरत आहेत.
यावेळी व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लिमिटेडचे जनरल मॅनेजर के. एस. दोरगे, असिस्टंट जनरल मॅनेजर व्ही. यु, सोनवणे, मुख्य अभियंता टी. एन. निघुते, उस व्यवस्थापक पी. बी. ड्रार्फ, उस तोडणी वाहतूक कंत्राटदार आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
उर्वरित गाळप हंगाम कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून पारदर्शक, नियमबद्ध व शेतकरीपूरक प्रशासन कायम ठेवून उद्दिष्टपूर्ती करण्यात येणार आहे.
कारखाना व्यवस्थापनाने सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावर आता पतीसोबत येणार पत्नीचेही नाव; काय आहे योजना? वाचा सविस्तर
