वैभव पतंगे
सातारा : भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे. तिला आई म्हणजेच गो-माता म्हटले जाते. प्रत्येक सणा दिवशी गायीला देवासमान मानून पूजा करण्याची प्रथा आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून जादा दूध उत्पादनाच्या हव्यासापोटी देशी गायीचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी सणावाराला गायीची पूजा करण्यासाठी नागरिकांना शोधाशोध करावी लागत आहे.
अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी. वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते, असे मानले जाते.
यंदा शुक्रवार, दि. १७ रोजी निज अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आहे. यंदाच्या वसुबारसला साधारण महत्व प्राप्त झाले आहे. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो.
भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात. गायीला गोडाधोडाचा घास भरविला जातो.
पूर्वी अनेकांचा शेती व्यवसाय असल्याने दारात खिलार गायीचे पालन केले जात होते. आता शेतकऱ्याकडून जास्तीचे दूध देणाऱ्या जर्शी गायीचे मोठ्या प्रमाणावर पालन होत आहे.
वसूबारसमागील उद्देश
◼️ घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात.
◼️ घरातील सुहासिनी बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. त्यानंतर पूरण पोळी, धान्य खायला देत असतात.
◼️ निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते.
◼️ पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.
गायी संगोपन केंद्राची मागणी
दिवसेंदिवस खिलार गायीचे घटते प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे गायी संगोपण केंद्राची मागणी वाढली आहे. सध्या देशी गायींचे तूप, दूध, गोमुत्र, शेणखताला बाजारात मोठी मागणी आहे. सध्या न्यायालयाने बैलगाडी शैर्यतीवरील बंदी उठविल्यामुळे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे. त्यामुळे देशी गायीपासून जन्मलेल्या वासरामुळे कित्येक शेतकऱ्यांना लखपती बनवले आहे.
वसुबारसला गायीची पूजा करावी. तिला पुरणपोळीचा घास भरवला जातो. हे चांगले आहे. पण एकाच दिवशी कित्येक महिला तिला बळजबरीनं खाऊ घालतात. यामुळे तिच्या आरोग्याचाही विचार करण्याची गरज आहे. एक दिवस पूजा करण्यापेक्षा तिचे जतन अन् संगोपन करण्यासाठी प्रबोधन गरजेचे आहे. - राजेंद्र दीक्षित, सातारा
अधिक वाचा: राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू