दापोली : वलसाड हापूसला 'जी-आय' मानांकन मिळण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावाला दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानेही विरोध केला आहे.
निकाल प्रतिकूल आल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णयही विद्यापीठाने प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केला आहे.
भारतीय किसान संघ, गांधीनगर आणि नवसारी कृषी विद्यापीठ, गुजरात यांच्यावतीने वलसाड हापूसच्या जी-आय मानांकनासाठी चेन्नई येथे अर्ज दाखल केला आहे. त्यावर ३० नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथे सुनावणी झाली.
यावेळी अॅड. हिमांशू काणे यांनी हापूस/अल्फान्सो आणि वलसाड हापूस यातील तांत्रिक, भौगोलिक व कायदेशीर फरक मुद्देसूदरित्या मांडत गुजरातच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
न्यायालयाने भारतीय किसान संघाला एक महिन्याची मुदत देत त्यांचे म्हणणे सादर करण्याची संधी दिली आहे. सुनावणीदरम्यान झालेली चर्चा कोकणासाठी सकारात्मक असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
कोकण हापूसचे २०१८ मध्ये मिळालेले भौगोलिक मानांकन अबाधित राहील, असा विश्वासही विद्यापीठाने व्यक्त केला आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांना एकत्रित मानांकन मिळवण्यासाठी २००६ पासून पाठपुरावा सुरू होता.
कोकण हापूस उत्पादक-विक्रेते सहकारी संस्था, रत्नागिरी आणि दापोली कृषी विद्यापीठ हे अधिकृत नोंदणी रजिस्ट्री असल्याचेही विद्यापीठाने म्हटले आहे.
वलसाड हापूसला मानांकन मिळाल्यास मूळ कोकण हापूसच्या ओळखीला तडा जाऊ शकतो, असा ठाम युक्तिवाद कोकणातील संस्था व विद्यापीठाने मांडला आहे. कोकण हापूसची शुद्धता व परंपरा जपण्याचा निर्धार विद्यापीठाने स्पष्ट केला आहे.
