सोलापूर : केवळ गाळप कमी झाले असे नाही, तर साखर उताऱ्यातही यंदा मोठी घट झाली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा गाळप व साखरेच्या उत्पादनाला सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात फटका बसल्याचे साखर आयुक्त कार्यालयातील माहितीवरून दिसत आहे.
सोलापूर जिल्हा ऊस क्षेत्र, साखर कारखाने व गाळपात एखाद्या वर्षाचा अपवाद सोडला, तर राज्यात आघाडीवर असतो. मात्र, यंदा सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांत ऊस उत्पादकांसोबत साखर कारखानदारही अडचणीत आले आहेत.
केवळ मागील चार वर्षातील ऊस गाळप, साखर व साखर उतारा पाहिला असता, यंदा कमालीचे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात तब्बल ३३ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले, मात्र हंगाम एक कोटी मे. टनवर थांबला.
उसाअभावी साखर कारखाने कमी कालावधीत चालले, शिवाय पूर्ण क्षमतेने चालले नाहीत. त्यामुळे साखर कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
२०२१-२२ मध्ये सोलापूर जिल्ह्यात दोन कोटी २६ लाख ३८ हजार मे. टन गाळप व दोन कोटी १३ लाख १५ हजार क्विंटल साखर उत्पादन, तसेच ९.४२ टक्के इतका साखर उतारा पडला होता. धाराशिव जिल्ह्यात ७० लाख ५७ हजार मे. टन ऊस गाळपातून ६७ लाख ७२ हजार क्विंटल साखर उत्पादन व ९.६ टक्के साखर उतारा पडला होता.
२०२२- २३ मध्ये सोलापूर जिल्ह्यात एक कोटी ८० लाख दोन हजार मे. टन गाळपातून एक कोटी ६१ लाख ४१ हजार क्विंटल साखर व ८.९७ साखर उतारा पडला होता. धाराशिव जिल्ह्यात ५० लाख २१ हजार मे. टन ऊस गाळपातून ४५ लाख २१ हजार क्विंटल साखर व ८.९८ साखर उतारा पडला होता.
२०२३-२४ मध्ये सोलापूर जिल्ह्यात एक कोटी ७३ लाख ५१ हजार मे टन गाळप, एक कोटी ६४ लाख ४ हजार क्विंटल साखर व ९.४५ उतारा, धाराशिव जिल्ह्यात ५६ लाख २७ हजार मे. टन ऊस गाळपातून ५१ लाख ५३ हजार क्विंटल साखर उत्पादन व ९.१६ टक्के साखर उतारा पडला होता.
२०२४-२५ या वर्षात १० मार्चपर्यंत सोलापूर जिल्हात एक कोटी एक लाख ७५ हजार मे. टन ऊस गाळपातून ८६ लाख ११ हजार क्विंटल साखर उत्पादन व ८.४६ टक्के साखर उतारा पडला आहे. धाराशिव जिल्ह्यात २८ लाख २८ हजार मे. टन ऊस गाळपातून १९ लाख २६ हजार क्विंटल साखर उत्पादन व ८.८१ टक्क्यांपर्यंत साखर उतारा पडला आहे.
'विठ्ठलराव शिंदे'चे गाळप निम्म्यावर
सोलापूर जिल्ह्यात पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे हा साखर कारखाना जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांपेक्षा अधिक गाळप करणारा आहे. २०२१-२२ मध्ये विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर साखर कारखान्यांचे २४ लाख ७९ हजार मे. टन ऊस गाळप झाले व साखर उतारा ९.४५ टक्के पडला होता, तर २४-२५ मध्ये ११ लाख २४ हजार मे.टन ऊस गाळप झाले आहे. साखर उतारा यंदा केवळ ६.४१ टक्के इतकाच पडला आहे.
अधिक वाचा: नोकरी अन् व्यवसायापेक्षाही अधिक नफा कमवून देतेय फौजींची शेती; १ एकर कलिंगडातून ३ लाखांची कमाई