बाळकृष्ण पुरोहित
भेंडा : जिल्ह्यात १२ सहकारी व १० खासगी एकूण २२ साखर कारखान्यांचे हंगाम सुरू आहेत. या हंगामात ७० दिवसांत ३० जानेवारीपर्यंत ६९ लाख ५ हजार ५५३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.
यावर्षी ऊस टंचाईमुळे साखर कारखान्यांचे गळीत हंगाम फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंद होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
१५ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे गळीत बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे साखर कारखान्यांना हंगाम बंदचे वेध लागले आहेत. जिल्ह्यातील २२ कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता १ लाख ७५० मेट्रिक टन इतकी आहे.
३० जानेवारीपर्यंत ६९ लाख ५ हजार ५५३ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५७ लाख ७४ हजार १७ साखर पोत्यांची निर्मिती करत सरासरी साखर उतारा ८.३६ टक्के इतका मिळविला आहे. ऊस टंचाईमुळे राज्यात ५० हजार टन साखर उत्पादन घटणार आहे.
आतापर्यंत नेवासा तालुक्यातील ३ कारखान्यांनी ११ लाख २६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यात ज्ञानेश्वर ६ लाख १६ हजार, मुळा ४ लाख ६० हजार, स्वामी समर्थ ५० हजार टन असे उसाचे गळीत झालेले आहे.
ऊस गाळपाचे मोठे आव्हान, द्यावा लागणार जादा दर
ऊस टंचाईमुळे साखर कारखान्यांना अपेक्षित ऊस गाळप करणे मोठे आव्हान आहे. यासाठी उसाला जादा दर द्यावा लागणार आहे. हे सर्व झाले तरी ऊस टंचाईमुळे जिल्ह्यातील कारखान्यांचे हंगाम फेब्रुवारी महिन्यांचे शेवटच्या आठवड्यात बंद होण्यास सुरुवात होईल.
ऊस तोडणीसाठी द्यावे लागतात पैसे
आता उन्हाचा तडाखा वाढला आहे. दिवसेंदिवस पाणीपातळीत घट होत आहे. ऊस तोडणी मजूर भल्या पहाटे उठून ऊसतोडणी करतात. उसाला तुरे फुटल्याने आपला ऊस कधी तुटणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. यामुळे ऊस तोडणीसाठी पैसे द्यावे लागत असल्याच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकरी करतात.
अधिक वाचा: C Heavy Ethanol Price : सी हेवी इथेनॉलच्या दरात १.६९ रुपयांची वाढ