निसर्गाचे चक्र बिघडले असतानाच असून, वर्षभर पाऊस पडत आहे. आता भातकापणीला सुरुवात झाली अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी बळीराजाकडून करण्यात येत आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने पाऊस पुन्हा एकदा अतिवृष्टीसारखा पडत आहे. या पावसामुळे संपूर्ण राज्यात सर्वांत जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
रोजच्या पावसाने अलिबाग तालुक्यातील भातशेती जमीनदोस्त झाली आहे. शुक्रवारी रात्री पडलेला पाऊस आणि वाऱ्यामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. तसेच झालेल्या भाताचे नुकसान बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत.
हजारो हेक्टरमधील पीक धोक्यात
• कोकणातील शेतकरी कधी नुकसानभरपाईसाठी आक्रमक होत नाही; परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
• दिवाळीदरम्यान झालेल्या पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. अलिबाग तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील भातशेती धोक्यात आहे.
• सध्याच्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी बळीराजाकडून होत आहे.
भात कापले तरी नुकसान, नाही कापले तरी नुकसान
• मेहनत आणि खर्च करून शेवटच्या टप्प्यात अवकाळी पावसामुळे नुकसान होत असेल तर आम्ही कसे जगावे? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
• सर्व भातशेती कापणीसाठी तयार आहे; परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी भातकापणीचे धाडस करत नाहीत.
• एकदा कापणी केली आणि पाऊस पडला तर भात आणि पेंडा खराब होतो. त्यामुळे भात कापणी केली तरी नुकसान आणि नाही केली तरी नुकसान अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे.
• त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
