समाधान इंदलकर
धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील वालवड व परिसरातील गावांमध्ये सध्या ज्वारी काढणीचा हंगाम जोरात सुरू असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतामध्ये सुगीचा उत्साहपूर्ण माहोल होता. शेतकरी कुटुंबांसह मजूर मोठ्या प्रमाणात ज्वारी काढणी व मोडणीच्या कामात व्यस्त होते. अनेक ठिकाणी ज्वारी काढून शेतात सुकण्यासाठी पसरवून ठेवलेली होती, तर काही शेतांमध्ये मोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले होते.
असे असतानाच बुधवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि काही क्षणातच संपूर्ण परिस्थिती बदलली. वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेली ज्वारी मोठ्या प्रमाणावर जमिनीवर आडवी पडली असून त्यामुळे काढणी व मोडणीचे काम ठप्प झाले आहे.
वालवडसह परिसरात सध्या रबी हंगामातील पिकांच्या काढणीची लगबग सुरू आहे. असे असतानाच बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतात काढून ठेवलेली ज्वारी पूर्णपणे भिजली आहे.
यामुळे कणसातील दाण्यांना कोंब फुटण्याची समस्या निर्माण झाली असून ज्वारीची गुणवत्ता घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. बाजारात या ज्वारीला कमी दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अधिकच वाढणार आहे.
तसेच सततच्या ओलाव्यामुळे ज्वारीच्या कणसांवर बुरशीचा प्रादुर्भाव होणार आहे. कणसे काळवंडणे, खराब होणे अशा प्रकारचे नुकसान दिसून येत असल्याने त्यामुळे उत्पादनावर थेट परिणाम होणार आहे.
या अवकाळी पावसाचा फटका केवळ ज्वारीपुरते मर्यादित न राहता मका, गहू व हरभरा या रब्बी पिकांनाही बसला आहे. या पिकांची काढणीही सुरू असताना पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे.
तातडीने पंचनामे करण्याची गरज
अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुहेरी संकट उभे ठाकले आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
द्राक्षबागा जमीनदोस्त
• चिंचपूर (बेलगाव शिवार) येथील शेतकरी अक्षय ढगे यांच्या द्राक्ष बागेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे बाणगंगा नदीकाठावरील द्राक्षबाग अक्षरशः जमीनदोस्त झाली असून उभ्या बागा झोपल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.
• या बागेतून यंदा ३५ ते ४० टन उत्पादन अपेक्षित होते, परंतु निसर्गाच्या कोपामुळे सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वर्षभर मेहनत करून हाताशी आलेला घास हिरावल्याने अक्षय ढंगे संकटात सापडले आहेत. शासनाने या नुकसानीचा तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
