Unseasonal Rain :मराठवाड्यात गुरूवारी (३ एप्रिल) रोजी दिवसभराच्या तीव्र उन्हानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
या पावसादरम्यान अनेकांच्या घरावरील पत्रे तसेच शेतशिवारातील कडब्याच्या गंजी उडून नुकसान झाले आहे. धाराशिव तालुक्यातील वरवंटी शिवारात सायंकाळी ५:१० वाजण्याच्या सुमारास वादळी वारे सुरू झाले.
यानंतर जवळपास तासभर पावसाच्या सरी कोसळल्या. यात कल्याण देशमुख यांच्या शेतातील कडब्याजी गंजी उडाली. जुनोनी परिसरालाही 'अवकाळी'ने तडाखा दिला.निसार शेख यांच्या घरावरील पत्रे उडाली. तेरमध्ये रिमझिम पाऊस झाला.
लोहारा शहरासह भातागळी, हराळी गावातही पंधरा मिनिटे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बलसूर भागातही सरी कोसळल्या.
हळद, कांदा व इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव व तालुक्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे हळद, कांदा व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
३ एप्रिल रोजी मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पाऊस होऊन वादळीवारे सुटतील, असा अंदाज 'वनामकृवि वर्तविला होता. त्यानुसार गुरुवारी औंढा नागनाथ, जवळाबाजार, आडगाव (रंजे) व सेनगाव तालुक्यातील कडोळी, केंद्रा (बु), पानकनेरगाव, सवना व इतर गावांत पावसाने जवळपास अर्धा तास हजेरी लावली.
दरम्यान, काही ठिकाणी वारेही सुटले होते. महिनाभरापासून शेत शिवारात हळद काढणीचे काम सुरू असून अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते.
परभणी जिल्ह्यात कुठे जोरदारतर कुठे रिमझिम
परभणी तालुक्यातील झरी परिसरात गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास काही वेळ पावसाने जोरदार हजेरी लावली. परभणी जिल्ह्यात गुरुवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला.
काही तालुक्यासह ग्रामीण भागातील गावांमध्ये अवकाळी पावसाने सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान हजेरी लावली. यामुळे अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांचीही धांदल उडाली.
परभणी जिल्ह्यात गुरुवारी दुपारी कडक ऊन पडले होते. मात्र, सायंकाळी ४ च्या नंतर परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली. यात मानवत रोड, मानवत शहर अशा परिसरात काही वेळ पावसाने हजेरी लावली. परभणी तालुक्यातील झरी परिसरात विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. याशिवाय चामणी, येलदरी परिसरात ढगाळ वातावरण होते.
ताडकळस परिसरात सुद्धा ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. झरी गाव परिसरामध्ये सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. परभणी शहरात वातावरणात बदल होऊन सायंकाळी ढगाळ वातावरण होते.
लातूरमध्ये कांदा, फळपिकांचे नुकसान
लातूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा, टरबूज, खरबूज, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी होत आहे.
लातूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. मात्र, सायंकाळी ५ ते साडेपाच वाजेच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उदगीर, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, उस्तूरी, निदूर, औसा शहरासह तालुक्यातील खरोसा, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ, डिगोळ, लातूर तालुक्यातील तांदुळजा, बोरगाव काळे, मुरुड परिसरात पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
उस्तुरी परिसरात गारा पडल्याने शेतातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा, टरबूज, खरबूज, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आणखीन दोन दिवस असेच पावसाचे वातावरण
औराद शहाजानीसह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. यात भाजीपाला, फळबाग पिकांचे नुकसान झाले असून, आणखीन दोन दिवस पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान ४१ अंशापेक्षा पुढे गेलेले तापमान खाली आल्याने नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली आहे.