भोगावती: परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामात उशिरा गाळप झालेल्या उसाला जाहीर केलेले प्रोत्साहनपर अनुदान ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले.
याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली. कारखान्याने गेल्या हंगामात २३ ते २८ फेब्रुवारीअखेर गाळप होणाऱ्या उसासाठी प्रति टन ५० रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर दर जाहीर केला होता.
या काळातील २४ हजार ७०६ टन उसाच्या बिलापोटी १२ लाख ३५ हजार ४०० रुपये तसेच १ ते १० मार्चदरम्यान गाळप होणाऱ्या उसाला प्रति टन १०० रुपये प्रोत्साहन दर जाहीर केला होता.
या काळातील २८ हजार ५२८ टन उसाच्या बिलापोटी २८ लाख ५३ हजार ०६८ रुपये संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले आहेत.
प्रोत्साहनपर दरापोटी ४० लाख ८८ हजार ४६८ रुपये संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करून कारखाना संचालक मंडळाने दिलेला शब्द पाळला आहे.
तसेच यावर्षीच्या उसाला प्रति टन ३६५३ रुपये दर जाहीर केला असून, पहिल्या पंधरवड्यातील बिले दिली आहेत.
अधिक वाचा: उसाला दर मिळाला पण आता काटेमारी अन् साखर उतारा चोरी कोण थांबवणार? वाचा सविस्तर
