रामटेक : किमान आधारभूत किमतीप्रमाणे (MSP) तुरीची विक्री करण्यासाठी सरकारने दिलेली नोंदणीची मुदत २४ जानेवारीला संपली होती. या काळात पुरेशा शेतकऱ्यांनी (farmer) नोंदणी केली नव्हती.
त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने नोंदणीला मुदतवाढ दिली असून, आता शेतकऱ्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येईल, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यांनी दिली. त्यामुळे आता तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
एमएसपी दराने शेतमालाची विक्री करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला आधी सरकारकडे ऑनलाइन(Online) नोंदणी करणे अनिवार्य आहे. यावर्षी नोंदणीची मुदत २४ जानेवारी पर्यंत जाहीर करण्यात आली होती.
वास्तवात, शेतकऱ्यांनी नोंदणीला उशिरा सुरुवात केली. त्यामुळे नोंदणी मुदतवाढ देणे अनिवार्य होते. वरिष्ठांकडून आदेश प्राप्त अजय बिसने यांनी ५ फेब्रुवारीला पत्र जारी करीत २४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले. ही घोषणा उशिरा करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे १२ दिवस वाया गेले आहेत.
यावर्षी चांगल्या प्रतीच्या तुरीचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी साफ करून वाळलेल्या तुरी विकायला केंद्रावर आणाव्यात असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
या प्रक्रियेत केंद्रावरील नाफेडच्या ग्रेडरची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सरकारी केंद्रावर तुरीला चाळणी लावली जात असल्याने शेतकरीबाजार समितीत व्यापाऱ्यांनी तुरी विकण्यास प्राधान्य देतात. दुसरीकडे, सरकारने सरसकट तूर खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नाफेडमार्फत तूर खरेदी
* सन २०२४-२५ या पणन हंगामासाठी केंद्र सरकारने तुरीची एमएसपी ७ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे. सध्या तुरीला खुल्या बाजारात ६ हजार ९०० ते ७ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
* यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरकार नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून एमएसपी दराने तुरीची खरेदी करणार आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
* तूर विक्री नोंदणी सुविधा रामटेक तालुका सहकारी खरेदी-विक्री समितीच्या कार्यालयात आहे.
* नोंदणीसाठी सातबारा, पीक पेरा व तुरीच्या पिकाची नोंद, बँक पासबुक व मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष मिन्नू गुप्ता व सचिव प्रशांत बोरकर यांनी केले आहे.