सांगली : जिल्ह्याच्या कर्नाटक सीमा भागात चार ते पाच साखर कारखाने झाल्यामुळे ते ऊस पळवत आहेत. परिणामी जिल्ह्यातील कारखान्यांना उसाची टंचाई निर्माण होत असते.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील साखर कारखानदारांनी राज्य सरकारकडे दि. १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यासाठी मागणी केली आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील कारखाने बॉयलर अग्निप्रदीपन करून गळीत हंगामासाठी सज्ज झाले आहेत.
राज्यातील गळीत हंगामाला यंदाचा दिवाळीचाच मुहूर्त लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गतवर्षी विधानसभा निवडणुकांमुळे कारखान्यांचा गळीत हंगाम १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता.
त्यामुळे शेतकऱ्यांसह कारखानदारांचेही नुकसान झाले होते. यंदा दिवाळीच्याच तोंडावर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका असल्या, तरी त्याचा हंगामावर फारसा परिणाम होणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.
जिल्ह्यात सोळा कारखाने सुरू होणार असून, त्यांनी गळीत हंगामाची पूर्ण तयारी केली आहे. पंधरा दिवस आधीच हंगाम सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हंगाम निश्चितीसाठी २९ सप्टेंबर रोजी मंत्री उपसमितीची बैठक होणार आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
त्यातच शेतकऱ्यांना यंदाचा गळीत हंगाम लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रतिवर्षी राज्याच्या मंत्री उपसमितीच्या बैठकीत हंगामाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.
कर्नाटकचे कारखाने १ नोव्हेंबरला सुरू◼️ कर्नाटक सरकारने तेथील राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी दि. १ नोव्हेंबरपासून परवानगी दिली आहे.◼️ या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारही राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यातील मुहूर्त ठरवू शकते.
१५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करा◼️ कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर सुरू झाल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस तेथील कारखाने घेऊन जातात. म्हणूनच राज्य सरकारकडे दि. १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे.◼️ त्यादृष्टीने गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. दि. २९ सप्टेंबरला मंत्री उपसमितीची बैठक आहे. या बैठकीत गळीत हंगामाची तारीख निश्चित होईल, असा विश्वास क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी व्यक्त केला.
उसाला ३५५० रुपये दर निश्चित◼️ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने २०२५-२६ च्या साखर हंगामासाठी उसाची एफआरपी १०.२५ टक्के, उताऱ्यासाठी तीन हजार ५५० रुपयांचा दर निश्चित केला आहे.◼️ त्यापुढील १ टक्क्यासाठी प्रत्येक टनाला ३४६ रुपये मिळणार आहेत. याउलट उताऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यास प्रतिटन ३४६ रुपये कमी होणार आहेत.◼️ मात्र, ९.५ टक्क्यांपेक्षा कमी जरी उतारा असला, तरी प्रतिटनाचा किमान दर हा तीन हजार ४६१ रुपयेच असणार आहे. यामुळे ९.५ टक्के साखर उताऱ्यासाठी कारखानदारांना शेतकऱ्यांना किमान तीन हजार ४६१ रुपये द्यावे लागणार आहेत.
अधिक वाचा: Tractor Kharedi : शेतकऱ्यांनो स्वस्तात ट्रॅक्टर खरेदी करण्याची योग्य वेळ आली; असा घ्या फायदा?