वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे हैराण झालेले या विभागातील शेतकरी गवे, रानडुक्करे आणि वानरांच्या तावडीतून पिके वाचविण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत.
वन्यप्राण्यांकडून शेतीचे होणारे आतोनात नुकसान ही गेल्या काही वर्षांतील या परिसरातील मोठी समस्या बनली असून, बहुतांश शेतकरी कुटुंबे त्यामुळे हैराण आहेत.
गवे, रानडुक्करे आणि वानरांचे कळपच शिवारांच्या परिसरात वास्तव्यास असल्याने शेतात पीक उभे असले, तरीही मळणी करून धान्य घरी येईलच याचीही शाश्वती शेतकऱ्यांना वाटत नाही.
डोंगर पट्टयात उपद्रव अधिकच असल्याने शेतकऱ्यांनी शेती पाडून ठेवली आहे. खर्चही निघत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कुटुंबांनी पोटापाण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला आहे.
काहीजण सपाटीच्या गावात शेतमजुरीला जात आहेत. डोंगरातील शेती पडून असल्याने वन्यप्राण्यांनी सपाटीच्या गावांकडे मोर्चा वळविला असून, तेथील शेतकरीही उपद्रवाने रडकुंडीला आले आहेत.
डबे व फटाके वाजविणे, बुजगावणी उभी करणे, वेगवेगळे आवाज काढणारे, स्पीकर बसविणे आदी उपाय फारसे प्रभावी ठरत नसल्याचे ध्यानात आल्यावर आता त्यांनी पिकात वाघाचे कटआउट लावायला सुरुवात केली आहे.
घाबरविण्यासाठी भिंतीवर बिबट्याची चित्रे
◼️ प्रकारची फळझाडे असलेल्या बागा, शिवारे आणि घरांच्या परिसरात वानरांचे कळपच्या कळप वास्तव्याला असून, त्यांना पळवून लावण्यासाठी काहींनी चक्क व्यवसाय व घरांच्या ठिकाणी भिंतीवर हुबेहूब भासावित, अशी बिबट्याची चित्रे काढण्याची अनोखी शक्कलही लढविली आहे.
◼️ स्थानिक चित्रकारांच्या मदतीने अशी चित्रे काढण्यात येत आहेत. परिसरात बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे. शिवारात वानरेही त्याचा अनुभव घेत असल्याने खरा असो की चित्रातला, बिबट्याला बघून वानरे धूम ठोकत आहेत.
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील अपाक शेरा म्हणजे काय? व तो कसा कमी करावा? वाचा सविस्तर