जळगावच्याकेळी उत्पादकांच्या शेतीला 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, त्यामुळे केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होणार आहे.
५० एकर क्षेत्रात 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची उभारणी करण्यासाठी गुरुवारी केंद्रीय पथकाने जिल्ह्यात दोन जागांची पाहणी केली आहे. जळगावसह जालना व नांदेड जिल्ह्याचादेखील यासाठी विचार करण्यात येत आहे.
'केळी' उत्पादनाचा उत्तम दर्जा व भरघोस उत्पादनातून शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी 'टिश्यू कल्चर' स्थापनेसह बीज उत्पादन, संरक्षण व संवर्धन सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील दोन जागांची पाहणी केली. लवकरच अंतिम जागा निश्चित होईल.
निर्यातीचा 'टक्का' वाढणार
या प्रकल्पामुळे जळगावच्या केळीचा दर्जा उंचावेल आणि थेट आंतरराष्ट्रीय बाजाराची दारे खुली होतील. त्यातून केळी निर्यातीचा 'टक्का' वाढणार आहे. साहजिकच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
दोन जागांची पाहणी
नवी दिल्लीतील भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक चेतन जोशी, वितरण साखळीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश तम्मीनन या दोन सदस्यीय पथकाने या शासकीय जागेची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक अमोल जुमडे उपस्थित होते.
टिश्यू कल्चर केळीचे फायदे
• रोगमुक्त : नियंत्रित वातावरणात वाढवत असल्याने ज्यामुळे संसर्गाची बाधा होत नाही.
• समान वाढ : सर्व झाडे समान गुणधर्माने वाढत असल्याने समान फळांचे उत्पादन हाती येते.
• जलद वाढ आणि उत्पादन : झाडे लवकर परिपक्व होत असल्याने उत्पादकाला फायदा होतो.
• आधुनिक उत्पादन : कोणत्याही ऋतूत केळीची लागवड केली जाऊ शकते.
• उत्कृष्ट दर्जाचे फळ : चांगला आकार, चव फळाचे उत्पादनाची निर्मिती होती.