अवसरी : आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोबी पिकाला समाधानकारक बाजार भाव मिळत नसल्याने, तसेच पिकावर पांढरी अळी, मावा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कोबी पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत १० किलो कोबीला ४० ते ७० रुपये इतका बाजार भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च सुटत नसून अनेक शेतकऱ्यांच्या कोबी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी कोबीच्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडल्याचे चित्र दिसत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावातून डिंभे उजवा कालवा व घोड नदीचे पात्र जात असल्याने शेतकऱ्यांना बारामाही पाण्याची उपलब्धता असते.
मंचर, गावडेवाडी, निरगुडसर, पारगाव, काठापुर, देवगाव, लाखनगाव, पोंदेवाडी, शिंगवे, पिंपळगाव आदी गावातील शेतकरी हमखास उत्पन्न मिळवून देणारी भाजीपाला पिके घेत असतात.
यात कोबी, फ्लॉवर, वांगी, हिरवी मिरची, गवार, भेंडी, काकडी, बीट आदी नगदी पिकांचे उत्पादन घेत असतात. मात्र यंदाच्या वर्षी अनेक पिकांना बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
शेतकरी अडचणीत
पाण्याचे योग्य नियोजन करून अनेक शेतकऱ्यांनी फ्लॉवरचे, कोबीचे पीक घेतले आहे मात्र कोबी पिकाला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या कोबीवर पांढरी अळी, मावा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांत शेळ्या-मेंढ्या सोडल्या आहेत.
बकऱ्यांना हिरवा चारा
शेतकऱ्यांनी खते, औषधे, मजुरी, खुरपणी, काढणी हा खर्च करून पीक घेतले मात्र उत्पादन खर्चदेखील सुटत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. काही शेतकऱ्यांनी कोबी पिके बकऱ्यांना हिरवा चारा म्हणून मेंढपाळांना दिली आहेत.
अधिक वाचा: दुधाळ गाई व म्हशी खरेदीसाठी मिळतंय अनुदान; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर