अतिवृष्टीसह वादळी संकटाने एकट्या ऑगस्ट महिन्यात १७ हजार ३३२ शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला झळ पोहोचवली आहे. ८ हजार २७ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांची नासाडी झाली असताना जळगाव जिल्हा प्रशासनाने ९ कोटी ८६ लाख २९ हजार २४५ रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दि.१७ रोजी पाठविला.
ऑगस्ट महिन्यात राज्यभरात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. २९ जिल्ह्यांमधील सुमारे १४ लाख हेक्टर पिकांना फटका बसला. १ ते २० ऑगस्ट या काळात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असताना त्याची मोठी झळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसली असून त्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हरवला गेला आहे.
या नैसर्गिक संकटात मुख्यतः कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, भाजीपाला यासारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णतः नष्ट झाले असून काही ठिकाणी उभं पीक जमिनीवर आडवं पडलं आहे. सततच्या पावसामुळे पिकात रोगराईही वाढली आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून तातडीची मदत लवकर मिळावी, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांमध्ये अद्यापही अनिश्चिततेचं वातावरण आहे. अनेकांनी पीकविमा घेतलेला असला तरी नुकसानभरपाई कधी व किती मिळेल, याबाबत शंका आहे. राज्य शासनाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या हाती वेळेत मदतीची रक्कम पोहोचावी, अशी मागणी सध्या सर्वत्र होत आहे.
पीकनिहाय भरपाईचा प्रस्ताव दृष्टिक्षेपात
पीक क्षेत्र | बाधित क्षेत्र | अपेक्षित भरपाई (लाखात) |
जिरायत | ४७११ | ४००.६६ |
बागायत | २९३० | ४९८.७० |
फळपीक | ३८६ | ८६.९२ |
एकूण | ८०२७ | ९८६.२९ |
ऑगस्ट महिन्यातील तालुकानिहाय नुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका | बाधित गावे | बाधित शेतकरी | बाधित क्षेत्र |
जळगाव | २९ | २१७९ | १०२८.३५ |
रावेर | १५ | १४९ | ६१.०९ |
भुसावळ | ०१ | ०६ | ०१.३० |
बोदवड | ०१ | ०४ | ०.५६ |
पाचोरा | २६ | १००९ | ५३५.९६ |
भडगाव | ०६ | ८१० | २१२.३१ |
जामनेर | १५ | ४९३ | २०४.८४ |
चाळीसगाव | १२ | ३४० | १५६.१४ |
अमळनेर | ३७ | १५८६ | ७६१.७० |
चोपडा | २४ | ३९२ | १७४.५४ |
एरंडोल | ६५ | ३२०४ | २०३१.८८ |
धरणगाव | ८७ | ३४८५ | १७१०.२० |
पारोळा | ४५ | ३६७५ | ११४९.११ |
एकूण | ३६३ | १७३३२ | ८०२७.९८ |