पुणे : देशात यंदा सुमारे ३५० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज असून, आतापर्यंत अर्थात ३१ डिसेंबरअखेर ११८ लाख टन नवीन साखर तयार झाली आहे.
त्यात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा असून, राज्यात सुमारे ४९ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. त्या खालोखाल उत्तर प्रदेशात ३५ लाख टन साखर तयार झाली आहे.
महाराष्ट्रात यंदा ११० लाख साखर उत्पादनाचा अंदाज असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात सुमारे ३० लाख टनांची वाढ अपेक्षित आहे.
देशात ३१ डिसेंबरपर्यंत ४९९ साखर कारखान्यांनी १ हजार ३४० लाख टन उसाचे गाळप केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत २३७ लाख टनांनी हे गाळप जास्त आहे.
यंदा आतापर्यंत सरासरी साखर उतारा ८.८३ टक्के असा मिळाला असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात ०.१६ टक्के वाढ झाली आहे.
त्यानुसार यंदा आतापर्यंत ११८ लाख टन नवीन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षाच्या याच तारखेच्या तुलनेत यंदा त्यात २३ लाख टनांची वाढ झाली आहे.
यंदा अंतिम निव्वळ साखर उत्पादन अंदाजे ३५ द लाख टन अपेक्षित आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात ५३.२० लाख टनांची वाढ होण्याचा अंदाज आहे.
यामध्ये ३५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाणार आहे. देशात आतापर्यंत सर्वाधिक साखरेचे उत्पादन ४८.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
राज्यात ५५६.५७ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे, तर गेल्या वर्षी याच दिवशी ३४७.६७ लाख टन गाळप करण्यात आले होते. आतापर्यंत साखर उतारा ८.७५ टक्के मिळला आहे. गेल्या वर्षी हा उतारा ८.६० टक्के होता.
देशात दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन उत्तर प्रदेशात ३५.६५ लाख टन झाले आहे. गेल्या वर्षी या राज्यात ९२.७५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा त्यात आठ लाख टनांची वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदा उत्तर प्रदेशात आतापर्यंत ९.७० टक्के साखर उतारा मिळाला आहे.
देशात आतापर्यंत झालेले साखर उत्पादन समाधानकारक आहे. यापुढील काळात त्यात आणखी वाढ होईल. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ
अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यात 'या' २३ कारखान्यांनी अखेर जाहीर केला ३ हजार व त्यापेक्षा अधिक ऊस दर
