कोल्हापूर/कोपार्डे : गेल्या वर्षभरात उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे. वर्षभरातील साखरेच्या दराची सरासरी काढल्यास ३८०० रुपये क्विंटल होते. इथेनॉल, बगॅस, मोलॅसिस, प्रेसमड, अल्कोहोल यासह इतर उपपदार्थांनाही चांगला दर असून, गेल्या वर्षभरात भाव स्थिर होते.
याचा विचार करता गत हंगामातील तुटलेल्या उसाला एफआरपी अधिक २०० रुपये, तसेच या हंगामात पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये द्यावेत, या मागण्यांचे निवेदन 'स्वाभिमानी'च्या वतीने कुंभी कासारीचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, गेल्या पाच वर्षांत ३ हजार ते ३१०० पर्यंत दर मिळाला आहे. साखर व उपपदार्थ विक्रीतून आलेल्या पैशातून साखर कारखान्यांचा प्रक्रिया खर्च, तोडणी वाहतूक व व्याजाची रक्कम वजा जाता अजूनही पैसे शिल्लक राहिले असून प्रतिटन २०० रुपयांचा दुसरा हप्ता देणे सहज शक्य आहे.
चालू गळीत हंगामामध्ये ३७५१ रुपये दर द्यावा. वाढीव तोडणी वाहतुकीचा प्रतिटन १०० रुपयांपासून ते ३०० रुपयांचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांवर पडू लागला आहे. यामुळे यावर्षी २५ किलोमीटरचीच तोडणी वाहतूक कारखान्याकडून कपात करण्यात यावी. याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.