कोल्हापूर : योग्य व्यवस्थापन, सुधारित जातींमुळे मिळणारे उत्पन्न यामुळे दोडका या मांडववर्गीय पिकाच्या लागवडीतून शेतकरी चांगला पैसा मिळवत आहेत.
विशेष म्हणजे आज दोडक्याची बी रोवली की ४५ ते ६० दिवसांत उत्पादन सुरू होते. सध्या किरकोळ बाजारात दोडक्याचा दर १२० रुपये किलोपर्यंत पोहचला आहे.
अजून आवक कमी असल्याने किमान पंधरा दिवस दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे. तसेच ह्या भाजीला वर्षभरही चांगली मागणी असते.
भाजीपाल्याला शेणखतच ठरते उपयुक्त
◼️ भाजीपाला चांगला पिकवायचा झाल्यास रासायनिक खतांपेक्षा शेणखतच उपयुक्त ठरते.
◼️ त्याचबरोबर चांगली मशागत करुन दोडक्याची बियांची पेरणी चांगल्या प्रकारे केली, तर उत्पादनही चांगले मिळते.
'जीवामृत'ची आळवणी
◼️ सांगरूळ येथील सर्जेराव मगदूम यांनी आपल्या सात गुंठ्यात डिसेंबर महिन्यात दोडक्याच्या बियांची लागण केली.
◼️ ते आठवड्याला देशीचे गायीचे गोमूत्र, शेण व गुळाच्या मिश्रणाच्या (जीवामृत) आळवणी करतात.
◼️ दोडक्याच्या मुळांना ताकद येतेच, त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढते.
◼️ त्याचबरोबर देशीच गायीचे दूध व गोमूत्र एकत्रित करून आठवड्याला फवारणी करतात, ज्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
खराब हवामानाचा फटका
◼️ वेलवर्गीय भाजीपाल्याला किडीचा प्रादुर्भाव तुलनेत अधिक असतो.
◼️ त्यात ढगाळ व पावसाळी वातावरण झाले, तर त्याचा अधिक त्रास शेतकऱ्यांना होतो.
◼️ त्यावेळी किटकनाशकांची फवारणी करावी लागते. यात आपण जैविकदृष्ट्या पिक संरक्षण करू शकतो.
भाजीपाल्याला राबणूक अधिक आणि उत्पादन अपेक्षित मिळत नसल्याने शेतकरी उसाच्या मागे लागले आहेत. पण, नियोजनबद्ध दोडक्यासह कारली, भेंडी आदी भाज्यांचे उत्पादन घेतले, तर नफा चांगला राहतो. सध्या आम्हाला सात गुंठ्यात रोज ३० ते ४० किलो दोडका मिळतो. - सर्जेराव मगदूम, शेतकरी, सांगरूळ
अधिक वाचा: जनावरांच्या चाऱ्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले; शाळूच्या कडब्याला शेकडा काय मिळतोय दर?
