करमाळा : तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील वाशिंबे हे गाव जी-९ केळीबरोबरच दक्षिण भारतात पिकणाऱ्या वेलची केळीसाठी प्रसिद्ध होत आहे.
येथील शेतकऱ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर वेलची केळीचे भरघोस उत्पादन घेतल्याने परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही वाशिंबे गावांतील येथील शेतकऱ्यांचा आदर्श घेत जी-९ व वेलची केळीच्या बागांची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू केली आहे.
दक्षिण भारतात प्रामुख्याने पिकणाऱ्या वेलची केळीचे यशस्वी उत्पादन घेतल्यामुळे वाशिंबे गाव आता कृषी क्षेत्रातही इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
वाशिंबे येथील शेतकऱ्यांनी २०११ च्या सुमारास जी-९ केळीची, तर २०१५ मध्ये दक्षिण भारतात पिकणाऱ्या वेलची केळीच्या वाणाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी केला आहे. सध्या जवळपास एक हजार एकर क्षेत्रावर वेलची केळीची लागवड करण्यात आली आहे.
सुमारे ६० रुपयांपर्यंत दर◼️ रिटेल उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांकडून या केळ्यांची खरेदी केली जात आहे.◼️ पुणे, मुंबई व नाशिक येथील फाइव्ह व सेव्हन स्टार हॉटेल्स, रिलायन्स, बिग बास्केट, टाटा यासारख्या मोठ्या मॉलमध्ये वेलची केळीची विक्री होत आहे.◼️ सध्या वेलची केळीला प्रतिकिलो सुमारे ६० रुपयांपर्यंत दर मिळत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.
स्थानिक युवकही केळीच्या व्यापारात सक्रिय◼️ वेलची केळी लागवडीचा परिणाम म्हणून वाशिंबे गावात आलिशान निवासी घरे, नामांकित कंपनीच्या चारचाकी गाड्या दिसून येत आहेत.◼️ स्थानिक युवक केळीच्या व्यापारात सक्रिय झाले असून अनेक शेतकऱ्यांची मुले उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहेत.
मागील दहा वर्षांपासून वाशिंबे येथे दक्षिण भारतात पिकणाऱ्या वेलची केळीबरोबरच जी-९ केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि बाजारपेठेचा अभ्यास करून येथील शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांची लागवड यशस्वी केली आहे. - सुयोग झोळ, वाशिंबे, ता. करमाळा
अधिक वाचा: टिशू कल्चर रोप विक्री उद्योगाबाबत न्यायालयाचा अत्यंत महत्वाचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर