चांदखेड : शेतकऱ्यांनी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवड केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.
यासाठी ठिबक सिंचन आवश्यक असल्याने कारखान्यामार्फत प्रतिएकरी पाच हजार अनुदान देण्यात येणार असून, गेल्या हंगामात चार लाख मेट्रिक टन गाळप करण्यात आले.
या हंगामात पाच लाख टन गाळप झाल्यास उसाला ३१५० रुपये दर देऊ, असे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे यांनी घोषित केले.
कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाकड येथे नुकतीच झाली. कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन झाले.
यावेळी आमदार शंकर मांडेकर, संचालक माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, चेतन भुजबळ, धैर्यशील ढमाले, धोंडीबा भोंडवे, राजेंद्र कुदळे, दत्तात्रय उभे, छबुराव कडू, यशवंत गायकवाड, संदीप काशिद उपस्थित होते.
जास्तीचा दर द्या, दिवाळीत साखर वाढवून द्यावी
सभासद गोविंद दिघे यांनी ताळेबंदपत्रावर आक्षेप घेत कारखाना माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. सभासदांकडून इतर कारखान्याप्रमाणे उसाला जास्तीचा दर द्यावा, तसेच दिवाळीमध्ये मिळणारी साखर वाढवून मिळावी, अशी मागणी केली. या वेळी परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
अधिक वाचा: पुणे जिल्ह्यातील 'हा' कारखाना शेतकऱ्यांची दिवाळी करणार गोड; उसाचा शेवटचा हप्ता खात्यावर जमा